तुमसर: जंगलाशेजारी शेतशिवारात विहिरींना कठडे बांधण्यासाठी वन विभागाची श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेसह केंद्र शासनाच्या ढीगभर योजना अस्तित्त्वात आहेत. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने जंगलातील बिबट्या, वाघ व इतर वन्य प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत आहेत.एका आठवड्यापूर्वी भंडारा जिल्ह्यात अशी घटना घडली. यावर मात करण्याकरिता तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन विभागाने वन्यप्राणी बचावासाठी यापूर्वीच पुढाकार घेतला असून, या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी मृत्युमुखी पडले नाहीत.
गत आठवड्यात भंडारा जिल्ह्यात वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू पाण्याच्या टाक्यात पडून झाला होता. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आल्याची चर्चा संपूर्ण राज्यात चर्चेला आली. सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी जंगलातील व जंगलांलगतच्या शेतातील विहिरींची माहिती प्रत्येक वन परिक्षेत्रातून पाठविण्याचे निर्देश वन विभागाने दिले होते. सदर विहिरींना कठडे बांधण्याची कामे तत्काळ करावी व तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश वन विभागाने केले होते. यानंतरही जंगलव्याप्त परिसरात विहिरीत पडून वन्यप्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांमुळे वन विभागाचे दुर्लक्ष येथे दिसत आहे. अद्यापपर्यंत वन विभागाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही, असे दिसून येते. वन विभागाने संबंधित वन परिक्षेत्राला आदेश दिल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात वन्य प्राणी जंगलात पाण्यासाठी वणवण भटकतात. रानटी कुत्रे पाठलाग करताना अनेक तृणभक्षी प्राण्यांचा जीव गेला आहे. वाघ, बिबट्यासह अन्य प्राण्यांचा सातत्याने कठडाविना विहिरीत पडून मृत्यू होत आहे.
बॉक्स
नाकाडोंगरी वन परिक्षेत्र चर्चेत
राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी जंगल शिवारातील विहिरींना कठडे बांधण्याचा नवीन पायंडा घातला. सदर जंगल घनदाट व राखीव आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. केंद्र शासनाची योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत केवळ दहा लाख रुपयात वन परिक्षेत्रातील ३९ विहिरींवर आतापर्यंत कठडे उभारले आहेत. यामुळे या वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याचे प्रमाण शून्य आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लावल्यास वन्य प्राण्यांचा जीव वाचविण्यास मोठी मदत होईल.
कोट
केंद्र पुरस्कृत योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात जंगलात लागून असणाऱ्या शेतातील विहिरी व जिथे अशा घटना होण्याची शक्यता आहे त्या गावातील विहिरींची निवड केली. या विहिरींवर शेतकऱ्यांना कठडे बांधून घेण्याकरिता अर्ज करण्यास सांगण्यात आले. सन २०१९ - २० या काळात विहिरीवर कठडे बांधून झाले. त्यानंतर नाका डोंगरी वन परिक्षेत्रात वन्यप्राणी विहिरीत पडण्याची एकही घटना घडली नाही.
नितेश धनविजय
वन परिक्षेत्र अधिकारी, नाका डोंगरी.