१३ लोक २२ के
मोहन भोयर
तुमसर: देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू झाली आहे. उड्डाणपुलावरून सुसाट वाहने धावत आहेत. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूची संरक्षण भिंतीची उंची साडेतीन फूट इतकी आहे. त्यामुळे एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास आले. मागील एक महिन्यापासून उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला आहे. पुलावरून सुसाट वेगाने धावत असून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात येथून सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत तयार ,करण्यात आली आहे; परंतु या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्याची माहिती आहे साधारणपणे साडेतीन फुटांची ही भिंत आहे. एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
२४ कोटीचा हा उड्डाणपूल असून त्याची उंची जास्त आहे. त्यामुळे पुलाची संरक्षक भिंत ही किमान साडेचार फूट ठेवण्याची गरज होती. पुलाच्या दोन्ही बाजूला येथे स्पीडब्रेकर ठेवण्याची गरज होती. स्पीड ब्रेकरचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यात तांत्रिक अडचण असल्याची माहिती पुढे आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला इतर पर्यायी रस्ते असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता जास्त वर्तविण्यात येत आहे.
पुलावर अंधाराचे साम्राज्य: दिवाळी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाली; परंतु उड्डाणपुलावर रात्री अंधाराचे साम्राज्य असते उड्डाणपुलावर किमान सोलर लाईटची व्यवस्था करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता वर्ग : रामटेक तुमसर गोंदिया राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित विभागाने उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम केले, परंतु ७० ते ८० मीटर नालीचे बांधकाम केले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्याचा त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे नाली बांधकाम तत्काळ सुरू करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने गोंदिया महामार्गावर अजूनपर्यंत सर्व्हिस रोडचे डांबरीकरण केले नाही. रस्ता अजूनही खड्डेमय आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने शिल्लक नाली बांधकाम व सर्व्हिस रस्ता तत्काळ बांधकाम करण्याची गरज आहे.