भंडारा : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पोर्टलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळवण्यासाठी ५२३ जणांनी आतापर्यंत अर्ज केल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. अनुदानित बियाणे व पीक प्रात्यक्षिके योजनेकरिता ऑनलाइन अर्जाची सुविधा कृषी विभागाने उपलब्ध करून दिली होती. मात्र, ही प्रक्रिया किचकट असून, थेट आम्हाला जिल्हास्तरावरच कूपन पद्धतीनेच लाभ द्यावा, अशीही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. महाडीबीटी योजना म्हणजे ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी अवस्था असल्याचेही काही संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलमार्फत आतापर्यंत यांत्रिकीकरणासाठी ४५१ शेतकऱ्यांना अर्ज केला. यातील १५८ जणांना पूर्वसंमती दिली आहे. ठिबक, तुषार सिंचनसाठी २५२ जणांनी अर्ज केले होते. ४८ जणांना पूर्वसंमती मिळाली आहे, अनुदानित बियाणांसाठी ५२३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, अनुदान बियाणांची राज्यस्तरावरून सोडत पद्धतीने लॉटरी काढली जाणार असून, त्याचा थेट शेतकऱ्यांना संदेश येणार आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेसह विविध योजना कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलमार्फत एकाच अर्जाद्वारे राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यातून ५२३ अर्ज महाडीबीटी पोर्टलवर
भंडारा जिल्ह्यातून अनुदानित बियाणांसाठी आतापर्यंत ५२३ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने सोडत काढून बियाणांचे वाटप होणार आहे. हे कूपन शेतकऱ्यांना कृषी सहायकांमार्फत देऊन कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करता येणार आहे.
बॉक्स
यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला
भंडारा जिल्ह्यातून महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरण योजनेकडे सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४५१ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केला आहे. शेतकरी यांत्रिकीकरण योजनेसाठी सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्याखालोखाल अनुदानित बियाणे तसेच प्रधान मंत्री सूक्ष्म सिंचन योजना व अन्य योजनांसाठी प्राधान्य देत आहेत. अनुदानित बियाणांसाठी लाखांदूर सर्वाधिक २०७, लाखणी १३०, साकोली ८२, पवनी ८५, मोहाडी ८३, भंडारा ७८, तुमसर तालुक्यातील ५८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी अर्ज केले आहेत.
बॉक्स
शेतकऱ्यांनाच थेट अनुदान मिळणार
कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पीक प्रात्यक्षिकांसाठी आता शेतकऱ्यांना थेट त्यांच्याच बँक खात्यावर अनुदान मिळणार आहे. एका शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास दोन ते चार हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यात बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये यांसह अन्य प्रात्यक्षिकांसाठी हे अनुदान राहणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यावर्षी कृषी विभागाने दहा टक्के खत बचत मोहीम तसेच बीजप्रक्रिया असे उपक्रम राबवले आहेत. शेतकरी प्रशिक्षण तसेच शेतकरी सभांमधून रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, जमिनीचा पोत सुधारावा, असे आवाहन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर यांनी केले आहे.
बॉक्स
कृषी सहायकांशी संपर्क साधावा...
एसएमएस आला तरच शेतकरी अनुदानित बियाणे मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत. एसएमएस मिळाल्यावर शेतकऱ्यांनी पुढे नेमके काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, एसएमएस येताच शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे तंत्र अधिकारी योगेश मेहर यांनी सांगितले.
बॉक्स
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणांबाबत मोबाइलवर एसएमएस येणार आहेत. एसएमएस प्राप्त झाला तरच अनुदानित बियाणे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. दोन एसएमएस आल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायकांना संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे.
कृषी विभागातर्फे कोरोनामुळे शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र येत आपल्या गटाच्या नोंदणीसह खते, बियाणांची मागणी जवळच्या कृषी केंद्राकडे करावी, असे आवाहन कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.
ReplyForward