भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील स्मशानभूमीत गुरुवारी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना पावसाचे आगमन झाले हाेते. दहनशेड नसल्याने गाेंधळ उडाला हाेता. चिता विझविण्याची शक्यता निर्माण झाली. पावसाने ओले सरण पेटत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी सरणावर ताडपत्रीचे छत्र धरून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली हाेती. यावेळी उपस्थित नातेवाईक पावसाने ओलेचिंब झाले हाेते. येथे मरणानंतरही मरणयातना आणि सुविधांचा अभाव असल्याने ग्राहकांमध्ये प्रशासनाविरुद्ध राेष व्यक्त करण्यात आला. यासंबंधीचे वृत्त लाेकमतने प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विनयकुमार मुन यानी हे प्रकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे पाठविले असून जिल्हा वार्षिक विकास व नियाेजन समिती अंतर्गत समाविष्ट करून महिनाभरात आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लवकरच खुटसावरी येथे अंत्यसंस्कारासाठी आता ताडपत्रीच्या छताचा वापर करावा लागणार नाही. साेयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
स्मशानशेडसाठी महिन्याभरात आर्थिक तरतूद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:38 AM