आॅनलाईन लोकमतभंडारा : चुक नसतानाही हेतूपुरस्सर रेतीचे वहन करणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकांवर कारवाई केली जाते. या अन्यायाची योग्य चौकशी करून न्याय व रोजगार देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी भंडारा जिल्हा ट्रॅक्टर मालक-चालक संघर्ष समितीचे पदाधिकारी नऊ दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत आहेत. एसडीओंशी चर्चाही निष्फळ ठरल्याने मेल्यावर समस्या सोडविणार काय? अशा संतप्त प्रतिक्रीया उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे.भंडारा तालुक्यात रोजगारासाठी अनेकांनी ट्रॅक्टर खरेदी करून उपजीविका करण्यासाठी पुढाकार घेतला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून खनिजाची वाहतूक होत आहे. कागदपत्रांची पुर्तता असतानाही विनाकारण उपविभागीय अधिकारी ट्रॅक्टरमध्ये साहित्य नसतानाही कारवाई करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जप्ती करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संशयित आरोपी म्हणून कलम २०७ नुसार नोटीस देऊन जबराईने ‘बाँड’ लिहून घेतल्या जात आहे. ते लिहून न दिल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी अधिकाºयांकडून मिळत आहे. या प्रकारामुळे ट्रॅक्टर चालक मालक मानसिकदृष्ट्या खचले आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कर्ज घेऊन ट्रॅक्टरची खरेदी केल्यानंतर त्या माध्यमातून मोबदला मिळत नसल्यामुळे चालक मालक धास्तावले आहेत. विनाकारणाने ट्रॅक्टर पकडूनये, जप्ती केलेले ट्रॅक्टर त्वरीत सोडण्यात यावे, भादंवि कलम १०७ नुसार दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, कलम १०७ नुसार संशयीत आरोपी म्हणून देणारे नोटीस बंद करण्यात यावे, करारनामा रद्द करण्यात यावा, रेतीघाटात रेतीने भरलेला ट्रॅक्टर मिळाल्यास त्याच ठिकाणी दंड आकारून वाहन सोडण्यात यावे, ट्रॅक्टर चालक मालकांना कमीत कमी किमतीमध्ये रेतीघाट उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. रेतीघाट उपलब्ध करून देण्यात यावा, गौण खनिज डम्प करून त्याची खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी. या मागण्यांसाठी त्रिमूर्ती चौकात उपोषणाला २२ जानेवारीपासून प्रारंभ केला आहे. निवेदनात पूनम माने, राजू शेंडे, अनिल ढेंगे, विरेश लिचडे, अमोल भोंगाडे, रामभाऊ भोपे, दिनेश भुते, प्रकाश सेलोकर, संजू कोरे, आदेश कांबळे, भाष्कर बांगडकर, डेनी भोंगाडे, कमलेश वैरागडे यांच्यासह ७५ जणांच्या स्वाक्षºया आहेत.
मेल्यावर समस्या सोडविणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:31 PM
चुक नसतानाही हेतूपुरस्सर रेतीचे वहन करणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकांवर कारवाई केली जाते.
ठळक मुद्देचर्चा ठरली निष्फळ : ट्रॅक्टर मालक चालकांचे उपोषण सुरूच