चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात शासकीय इमारती रिकाम्या पडल्या आहेत. नियोजनाअभावी शासकीय कार्यालय भाड्याच्या घरातून प्रशासकीय कारभार करीत असल्याने रिकाम्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार काय? असा सवाल आपसूकच निर्माण झाला आहे. नवीन इमारती मंजूर होत नाही. इमारत असताना उपयोगात आणले जात नाही. यामुळे पर्याप्त जागेमुळे नागरिकांना सेवा सुविधा मिळत नाही. रिकाम्या इमारतीत शासकीय कार्यालयाचे स्थानांतरण करण्याची मागणी होत आहे.
सिहोरा परिसरातील गावांत शासकीय इमारती रिकाम्या पडल्या आहेत. उपयोगाविना इमारती धूळ खात आहेत. या इमारतीमधून प्रशासकीय कारभार होत नसल्याने इमारती दुर्लक्षित झालेल्या आहेत. अनेक इमारतींची नासधूस झाली आहे. चुल्हाड गावांत आयुर्वेदिक दवाखान्याची सुसज्ज इमारत रिकामी आहे. या इमारतीत आधी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत होते. आरोग्य केंद्र नव्या इमारतीत स्थानांतरण झाले आहे. यामुळे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीला कुलूप लागले आहे. उपयोगाविना इमारत दुर्लक्षित होणार आहे. गावांत पशू वैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय भाड्याच्या घरातून प्रशासकीय कारभार करीत आहेत. आयुर्वेदिक दवाखान्याचे रिकाम्या इमारतीत वीज, पाणी, शौचालय, बैठकीची व्यवस्था, चार खोल्या, मैदान, मूलभूत सुविधा आहेत. एक एक खोली पशू वैद्यकीय दवाखाना, तलाठी, अभ्यास केंद्र व अन्य कार्यालयाला देण्याची गरज आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज व शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहेत. याच शिवारात असणाऱ्या बपेरा गावातही पशू वैद्यकीय दवाखान्याची मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाज मंदिरात पशू वैद्यकीय दवाखाना कार्यरत आहेत. याचे इमारत बांधकामासाठी वांदेच वांदे पेरून ठेवण्यात आले आहेत. या पशू वैद्यकीय दवाखान्याने मोकळा श्वास घेतला नाही. समाज मंदिरात सुरू असणाऱ्या या पशू वैद्यकीय दवाखान्यात सुविधाच नाहीत. इमारत बांधकामासाठी अनेक वेळा निधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु जागेचे वांदे आडवे आल्याने इमारत बांधकाम झाले नाही. कधी पुनर्वसित जागेत मंजुरीच्या चर्चा आल्या तर इमारत बांधकामाला विरोधाच्या चर्चा आलेल्या आहेत. याच गावात बस स्थानक परिसरात पर्जन्यमान मापक केंद्राच्या इमारती आहेत. रिक्त असून, या इमारतीत पशू वैद्यकीय दवाखाना स्थलांतरण करण्याची मागणी आहे. रिकाम्या इमारतीचा उपयोग प्रशासकीय कामकाजासाठी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे.
बॉक्स
पाटबंधारे विभागाच्या इमारतीत गोडाउन घ्या
रनेरा गावाच्या हद्दीत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून, आवारात दुर्लक्षित इमारती आहेत. या इमारतीच्या टिनाचे शेड जीर्ण झाले आहे. २ ते ३ इमारती अशाच पडून आहेत. या इमारतीच्या दुरुस्तीनंतर हजारो क्विंटल धान साठवणूक करता येईल. इमारतीला फक्त शेडची गरज आहे; परंतु या दिशेने प्रयत्न करण्यात येत नाहीत. दरम्यान, इमारतीचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते; परंतु प्रस्ताव रद्द करण्यात आले असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची धान साठवणूक करण्याची समस्या एका झटक्यात पूर्ण होणार आहे; परंतु लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाहीत. नवीन इमारती येत नाहीत. ज्या इमारती आहेत त्यांना संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नाहीत. यामुळे विकास बेपत्ता झाला आहे.
कोट
चुल्हाड व बपेरा गावांत शासकीय इमारती रिकाम्या असून, या इमारतीचा सदुपयोग झाला पाहिजे. गावातील तलाठी, पशू वैद्यकीय दवाखाना, अन्य कार्यालय स्थानांतरण केले पाहिजे, यामुळे शेतकऱ्यांना सुविधा मिळतील. प्रशासकीय कामकाज करताना त्रास होणार नसून, ग्राम पंचायतींनी यात पुढाकार घेतला पाहिजे.
देवेंद्र मेश्राम, तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस बिनाखी.