दिघोरी /मोठी : येथील चुलबंद नदीच्या तीरावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केल्या जात आहे . वाळू तस्कर मुख्य मार्गाने आपले वाहन न नेता शेतकऱ्यांच्या शेतावरून जाणाऱ्या पांदण रस्त्याने नेत असल्याने त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याने पायी चालणे ही कठीण झाले आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्या-येण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी करोडो रुपये खर्च करून पांदण रस्त्यांचे बांधकाम केले आहे मात्र दिघोरी येथील वाळू तस्कर वाळूने भरलेली वाहने दिवस-रात्र नेत असल्याने सदर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाणे-येणे कठीण होऊन बसले आहे याबाबत दिघोरीतील काही शेतकऱ्यांनी महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा हे दोन्ही विभाग मूग गिळून गप्प आहेत याचाच अर्थ वाळू तस्कर महसूल व पोलीस विभाग यांची आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याची खमंग चर्चा ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे
यापूर्वी दिघोरीच्या ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा महसूल व पोलीस विभागाला रेतीच्या ट्रॅक्टरसंबंधी माहिती दिली त्यावेळेस पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी येऊन फक्त थातूरमातूर कारवाई केल्याचा देखावा करतात. परंतु प्रत्यक्षात कोणत्या ट्रॅक्टरवर कारवाई केलेली नाही. याउलट माहिती देणाऱ्यास ट्रॅक्टर मालकाकडून धमकी दिल्या जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसापूर्वी दिघोरीचे तंटामुक्त अध्यक्ष महादेव कांबळे यांनी पोलीस व महसूल विभागाला अवैध रेती उपसाची माहिती दिली असता काही ट्रॅक्टर मालकांकडून कांबळे यांना ट्रॅक्टरने उडवून देण्याची धमकी दिली असल्याची माहिती कांबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दिगोरीच्या गंगामाई टेकर पासून नर्वे रेतीघाट आणि दिघोरी रेती घाट असे दोन पांदण रस्ते आहेत या दोन्ही रस्त्यावरून वाळू तस्कर दिवस-रात्र ट्रॅक्टर चालवत असल्याने बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर शेतातून पीक बाहेर काढणे ही एक मोठी समस्या उभी ठाकली आहे सदर दोन्ही रस्त्यावर महसूल आणि पोलीस विभागाने पुढाकार घेऊन रेती तस्करांच्या ट्रॅक्टर द्वारेच रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी दिघोरी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे
महसूल आणि पोलीस विभाग वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळच सांगेल
210921\img-20210921-wa0042.jpg
पांदन रस्त्याची दुरावस्था झाल्याचे बोलके छायाचित्र