पालांदूर : उन्हाळी धानाच्या कापणीचा हंगाम सुरू झालेला आहे. कापणी, बांधणी, मळणी, कोरोना संकटातही सुरू आहे. दररोज हजारो क्विंटल धान विक्रीकरिता शेतकऱ्याकडून उपलब्ध होत आहेत. मात्र १ मे रोजी नियोजित असलेला उन्हाळी धान विक्रीचा आधारभूत केंद्राचा मूहूर्त अजूनही सुरू न झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडलेला आहे. उन्हाळी हंगामातील आधारभूत खरेदीचा मुहूर्त निघेल काय, असा प्रश्न शेतकरीराजाला पडला आहे. शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ठरल्याप्रमाणे १ मे या कामगारदिनी उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभमुहूर्त होतो. परंतु १३ ते १४ लोटल्यानंतरही आधारभूत खरेदी केंद्राचा अजूनही शुभारंभ झालेला नाही. त्यामुळे नाइलाजाने आर्थिक विवंचनेत असलेला शेतकरी खासगी केंद्राला १४०० ते १४४० रुपये अशा पडक्या भावात विक्री करत आहे.
चूलबंद खोऱ्यात दररोज हजारो क्विंटल धान व्यापाऱ्यांमार्फत आंध्र प्रदेश, गुजरात व गोंदिया येथे जात आहे. पर्यायाने शेतकरी प्रतिक्विंटल चारशेपन्नास रुपयांच्या घरात नुकसान सहन करीत धान विकत आहे. लाखनी तालुक्यात उन्हाळी धानाचा हंगाम सुमारे ३१८४ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. सरासरीच्या ७० टक्के हंगाम आटोपतीला आलेला आहे. अवकाळी पावसाची टांगती तलवार सुरू आहे. १६ मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे मळणी झालेला धान भरून ठेवण्याकरिता शेतकरीवर्गाकडे जागेची कमतरता आहे.
बॉक्स
आधारभूत केंद्रावर खरिपाचा धान पडूनच!
खरीप हंगामातील आधारभूत खरेदी केंद्र अंतर्गत खरेदी केलेल्या धानाची उचल अजूनपर्यंत अपेक्षितपणे झालेली नाही. जिल्ह्यात खरेदी केलेल्या धानापैकी सुमारे एक ते सव्वा लक्ष क्विंटल धान्याची उचल झाली आहे. उर्वरित सुमारे छत्तीस लाख क्विंटल धान अजूनही गुदामाबाहेर व गुदामात पडून आहे. हा धान उचल होईपर्यंत खरेदी अशक्य आहे. धान उचलण्याकरिता मिलर्सकडून अपेक्षित सहकार्य होताना दिसत नाही. मात्र यात विनाकारण शेतकरी भरडला जात आहे.
कोट
जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची उचल होईपर्यंत उन्हाळी धान खरेदी करणे शक्य होणार नाही.
गणेश खर्चे,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.