लोकमत मदतीचा हात एक दिवसाच्या अंतराने हरविले मातृ-पितृ छत्र भंडारा : पोरकं करुन गेलेल्या आईच्या आठवणीत हुंदके सुरू असतानाच वडिलांनीही जगाचा निरोप घेतला. आई जाण्याच्या दु:खात वडिलांच्या जाण्याची भर पडली. मातृपितृ छत्र हरविल्याने या अनाथ भावंडाचा आधार हिरावला गेला आहे. अवघ्या १० वर्षाच्या संध्यावर दोन लहान भावंडाची जबाबदारी आली. या भावंडाना सावरण्यासाठी त्यांच्या आयुष्यात कुणीतरी ‘देवदूत’ येईल का?तुमसर तालुक्यातील साखळी या गावात दर्याव पटले हे पत्नी संगीता, १० वर्षाची संध्या, ७ वर्षाची स्वरूपा आणि तीन वर्षाचा आयुष असे हे कुटूंब गुण्यागोविंदाने राहत होते. दरम्यान, २१ आॅक्टोबर रोजी संगीता अचानक आजारी पडली. त्यानंतर ती स्वत:च तुमसर येथे रुग्णालयात उपचारासाठी गेली. उपचार सुरु असतानाच तिचा अचानक मृत्यू झाला. आई गेल्याचे दु:ख या भावंडासोबतच पत्नी गेल्याचे दु:ख दर्याव पटले यांनाही होते.दरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी दर्याव पटले यांनाही अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तुमसर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेले. तिथे त्यांना भरती होण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही अचानक मृत्यू झाला. कोणताही आजार नसताना या पटले दाम्पत्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या तिन्ही मुलांवरचे छत्र हिरावल्या गेले. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपले आणि आलेले नातेवाईक आपआपल्या मार्गाने निघून गेले. आत ही तिन्ही भावंडे आपल्या काकांकडे वास्तव्यास असली तरी काकाही हातपायानी अपंग आहेत. त्यामुळे या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी काकाच्या पत्नीवर येऊन ठेपली आहे. मोलमजुरी करुन ती माऊली पती व या तिन्ही भावंडाचा उदरनिर्वाह करीत आहे. हातचे आणून खाणे अशा कठिण स्थितीत या तिघांच्या शिक्षणाचा आणि पोटासाठी लागणाऱ्या अन्नाचा भार कसा सुटणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक. सारेकाही क्षणात होत्याचे नव्हते झाले. कुणावरही ओढवू नये असा प्रसंग त्या तीन भावंडावर ओढवला आहे. पटले कुटुंबांसोबत काळाने क्रूर थट्टा केली आहे. आतापर्यंत आई-वडिलांचा आधार घेऊन जगणाऱ्या या भावंडावर निराधार म्हणून जगण्याची वेळ आली आहे. आता या तिन्ही अनाथ भावंडाना समाजातील दानशूर म्हणविणाऱ्या खऱ्या ‘देवदूतां’ची गरज आहे, गरज आहे ती मदतीची आणि खंबीर आधाराचीही. तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख हे या तिन्ही भावंडांना आधार मिळावा, यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत. शक्य ती मदतही करीत आहेत. मात्र त्यांच्या एकट्यांची मदत पुरेशी ठरणारी नाही. त्यांच्या प्रयत्नांना समाजातील प्रत्येक घटकांचा हातभार लागण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘त्या’ अनाथ भावंडांना ‘देवदूत’ मिळेल का?
By admin | Published: November 22, 2015 12:27 AM