गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडलेले आहे. पिंडकेपार मूळ गावातील नागरिकांना बेला येथे पट्टे देण्यात आले. परंतु पिंडकेपार टोलीचा तर प्रश्न अद्यापही कायम आहे. २००४ च्या सुधारित सर्वेनुसार पिंडकेपार टोली येथील ७४ घरांचा निवाडा ५ डिसेंबर २०१२ रोजी पारित झाला होता. ७४ घरांचा सुधारित संयुक्त मोजणी अहवालासह पिंडकेपार टोली येथील ७४ खातेदारांचे मंजूर यादीत क्षेत्रफळामध्ये तफावत आढळून आली. तेव्हापासून हा प्रश्न कायम रेंगाळत आहे. अद्यापही या गावचे पुनर्वसन झाले नाही.
वैनगंगा नदीला १९६२ साली महापूर आला होता. त्यामुळे मूळ पिंडकेपार गावातील नदीतिरावरील कुटुंबांना टोलीवर स्थालांतरीत करण्यात आले. तेव्हा ५४ पट्टे भेटले होते. आता तेथे १०५ कुटूंब झाले आहेत. तर ७४ घरांचे पुनर्वसन मंजूर झाले आहेत. बेला येथील राष्ट्रीय महामार्गावर टोलीतील नागरिकांना जागा दिली जाणार असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही सर्वच्या सर्व कुटूंब पिंडकेपार टोलीतच राहतात.
गावालगत असलेली ही टोली म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन आणि शेती आहे. दरवर्षी वैनगंगेला पूर आला की गावाला वेढा पडतो. परंतु टोली थोडी उंचावर असल्याने गावाला जेवढा पुराचा फटका बसतो तेवढा टोलीला बसत नाही. मात्र गोसेखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात गाव येत असल्याने आज ना उद्या या धरणाचे पाणी वाढविले जाईल आणि संपूर्ण गाव पाण्याखाली येईल. त्यामुळे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
घर पडले तरी बांधता येत नाही
पिंडकेपार टोली गावाचे पुनर्वसन घोषित झाल्याने येथे कोणत्याही नागरी सुविधा नाहीत. घरकुल योजनेचा कुणाला लाभही मिळत नाही. घर पडले तरी बांधता येत नाही असे पिंडकेपार टोली येथील बेबी माकडे सांगत होत्या. शासनाने आमच्या मजुरीची व्यवस्था करावी. गेल्या वर्षी पावसाळ्यात घर पडले. परंतु आता घर बांधायला पैसेही नाहीत असे त्या म्हणाल्या.
अधिकारी केवळ टोलवाटोलवी करतात
पिंडकेपार टोलीचा रहिवासी राकेश तांबुलकर हा खासगी नोकरी करतो. गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे अशी त्याचीच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु अधिकारी आज होईल, उद्या होईल असे फिरवित आहे. आता कुणाकडे जावे असा प्रश्न आहे. पावसाळा आला की मनात कायम भीती असते असे राकेश सांगत होता.