लाखांदूर : गोदामाअभावी रखडलेली उन्हाळी धान खरेदी एकदाची सुरू झाली. मात्र, या खरेदी मागील विघ्न संपायचे नाव घेत नाही. आधीच उशिरा सुरू झालेली खरेदी आता बारदानांअभावी ठप्प झाली आहे. यंदा उन्हाळी धान खरेदी होईल का गा भाऊ, असे शेतकरी एकमेकांना विचारत असल्याचे चित्र लाखांदूर तालुक्यात आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात जवळपास १६ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. गत काही दिवसांपासून तालुक्यांत गोदामांच्या सुविधेअभावी सावकाश धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत तर जिल्हा पणन विभागांतर्गत खरेदी केंद्रांना पुरेशा प्रमाणात बारदान पुरवठा करण्यात येत नाही. आता तर धान खरेदी बंद पडली आहे. तालुक्यातील जवळपास ६ हजार ९५९ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यात जवळपास ३ लाख ५० हजार क्विंटल धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. शासनाने येत्या ३० जूनपर्यंत ऊन्हाळी धान खरेदीची तारीख निश्चित केली आहे. अशा स्थितीत जिल्हा पणन विभागाद्वारा केंद्रचालक संस्थांना आवश्यक तेवढा बारदान उपलब्ध करण्यात येत नसल्याने धान खरेदी प्रभावित झाली असून शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.