पवनी-सेलारी-सिरसाळा हा रस्ता मुख्य रस्त्यापासून एमएसईबी कार्यालय, तहसील कार्यालयासमोरून जाते. सदर रस्त्याच्या बाजूला सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तूप उत्खननात मिळाल्याने हा परिसर संरक्षित करण्यात आला असून, येथे वर्षभर देश-विदेशांतील पर्यटकांची वर्दळ असते. प्राचीन काळापासून पवनी-सेलारी रस्त्यावरून आंतर जिल्हा वाहतूक होत असल्याने प्रवाशांसाठी सोयीस्कर आहे. सन २०१९ या वर्षांत शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बांधकामाची मंजुरी प्रदान करून नागपूर येथील कंत्राटदाराकडून रस्ता बांधकामाचा करारनामा केला आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने बांधकाम सुरू केले. ११९. ३२ लक्ष रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या रस्त्याची लांबी २.७३ किमी असून, डांबरीकरण व दोन मोऱ्यांचाही यात मावेश आहे. डिसेंबर २०१९पर्यंत रस्ता पूर्णत्वाची मुदत असतानाही एक वर्ष जास्त लोटूनही बांधकाम पूर्ण झालेले नाही. अंदाजपत्रकात खडीकरण, डांबरीकरण व सिलकोट करण्याचे नमूद असतानाही बांधकाम करण्यात आलेले नाही. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून थातूरमातूर बांधकाम करतांना सिलकोट बाकी आहे. मात्र बांधकाम यंत्रणेने बांधकामाचे फलक लावण्यात कसर सोडलेली नाही. जवळपास ४०० मीटरपर्यंत दोन्ही बाजूला रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक दुचाकीला अपघात झाल्याचे प्रवासी सांगतात. तहसीलच्या बाजूला कॉलनी आहे. येथे भौतिक सुविधांची वानवा आहे. अशातच पवनी-सेलारी अपूर्ण बांधकामाने दळणवळणाच्या समस्येतही भर पडली आहे. या रस्त्यावरून दिवस-रात्र भरधाव चालणारे जड वाहने प्रवाशांसाठी धोका निर्माण करत आहेत. एकंदरीत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून अपूर्ण रस्ता त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
बॉक्स
बांधकाम अपूर्ण मात्र तरीही देयके अदा
पवनी-सेलारी-सिरसाळा रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले असून, याची अंदाजपत्रकीय किंमत ११९.३२ लक्ष रुपये एवढी आहे. २ मार्च २०१९ ही बांधकाम सुरू करण्याची तारीख असून १ डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते. सदर रस्ता बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील कंत्राटदाराला मंजूर करण्यात आला होता. मात्र तो विहित कालावधीत काम पूर्ण न करताच देयके अदा करण्यात आल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.