लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह व गारांचा पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली आहे. वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस अर्धा तास सुरू होता.तुमसर तालुका व शहरात शनिवारी सांयकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. वारा सुरु झाला. त्यानंतर गारासह पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे सर्वत्र धुळच धुळ झाली होती. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना रस्ता दिसेनासा झाला. मागीलवेळेच्या गारपिटीचा अनुभव वाईट असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली.या पावसामुळे वऱ्हाड्यांची तारांबळ उडाली. अर्धा तास वादळी पाऊस सुरु असल्यामुळे वीज पुरवठा ठप्प पडला. अनेक ठिकाणी घरांचे व दुकानांचे टीनपत्रे उडाले. वीज तारा व उपकरणात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातही वादळी पाऊस बरसला.सद्यस्थितीत सूर्य आग ओकत असून वातारणात प्रचंड उकाडा आहे. दिवसभर अघोषित संचारबंदी आहे. दुपारी १२ वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य होतात. पावसानंतर पुन्हा उकाडा निर्माण होईल, अशी स्थिती आहे. उकाड्यामुळे वीज पुरवठा नियमित झाला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आंधळगाव परिसरात वादळी पाऊसआंधळगाव/मोहाडी : सकाळपासून सूर्य आग ओकत होता. पारा ४६ अंशावर पोहोचला होता. अंगाची लाहीलाही होत होती. घामाच्या धारा निघत होत्या. शेतकरी सकाळपासून शेतावर गेला नव्हता. रस्ते निर्मनुष्य होते. मात्र सायंकाळी ४.३० वाजता वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह, गारा व विजेच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली आणि गारवा निर्माण झाला. यापावसामुळे कोणतीही हानी झाली नाही. परंतु छोट्या-मोठ्या झोपड्यांचे नुकसान झाल्याची चर्चा होत आहे. पावसासह गारा पडल्यामुळे प्रवाशांना आपली वाहने वाटेतच थांबवून रस्त्याच्या कडेचा आश्रय घ्यावा लागला.
गारांसह वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:34 PM
तुमसर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह व गारांचा पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देनागरिकांची तारांबळ : तुमसरात वीज पुरवठा ठप्प, मोहाडीतही वादळी पाऊस