लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्नीकांडात दहा निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांपासून डझनावर मंत्री भंडाऱ्यात आले. दोषींवर कारवाई होईल, अशी गर्जना करण्यात आली. देश हादरविणाऱ्या या घटनेला आता महिना पूर्ण होत आहे. महिनाभरात ही घटना विस्मृतीत गेली काय, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. डॉक्टर आणि परिचारिकांचे निलंबन करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. अद्यापही न्यायवैद्यक अहवाल प्राप्त झाला नाही. जणू या घटनेचे गांभीर्य संपले काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्नीकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर उच्चस्तरीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून जिल्हा शल्यचिकीत्सकांसह डॉक्टर, परिचारीकांवर कारवाई करण्यात आली.मात्र या घटनेकडे कुणीच गांभीर्याने बघितले नाही, असे दिसून येते. विरोधी पक्षातील लोकांना काही मागण्या केल्या परंतु त्याचाही फारसा प्रभाव पडला, असे आता म्हणता येत नाही. ज्या कुटुंबातील दहा बालकांचा या अग्नीकांडात बळी गेला त्यांचे सांत्वन करण्यात आले. तातडीने आर्थिक मदतही करण्यात आली. मात्र या घटनेला असलेले मुळ कारण अद्यापही पुढे आले नाही. न्यायवैद्यक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार, असे सुरूवातीला बोलले जात होते. परंतु आता तो विषयही जणू विस्मृतीत गेल्याचे दिसून येते.कुणावर कारवाई झाल्याने गेलेले दहा जीव परत येणार नाही. परंतु भविष्यात अशा घटना होवू नये यासाठी दोषींना शिक्षा होणे गरजेचे असते. परंतु येथे निर्ढावलेली आरोग्य यंत्रणा कुणाच्यातरी दबावात वावरत असल्याचे दिसत आहे. भंडारा ठाण्यात केवळ या दहा बालकांच्या मृत्यूची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. दहा जीवांना न्याय देण्यासाठी कोणी तरी गांर्भीयाने या विषयावर रस्त्यावर उतरायला हवे, परंतु आता महिनाभरानंतर या घटनेतील गांभीर्य संपले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्हा रुग्णालय सुधरता सुधरेना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्नीकांडानंतर येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट होईल, अशी अपेक्षा होती. सुरूवातीच्या आठ दहा दिवसात ही यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतही होती. परंतु आता पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. वेळेवर कुणीही भेट नाही. अनेकदा तर रुग्णांच्याच नातेवाईकांना स्टेचर ओढर रुग्णाला वॉर्डात न्यावे लागते. पट्टीबंधन कक्षातही अशीच अवस्था आहे. एका रुग्णाला तर स्वत:च ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्याची घटना दोन दिवसापुर्वी घडली.