एकोडी : येथील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सुरक्षा भिंतीला महिन्याभरातच बांधकामाला तडे गेल्याने संबंधित बांधकामबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज मंदिर असून दानशूर वासुदेव बापू खोब्रागडे यांनी आपल्या शेतामध्ये हे मंदिर स्वखर्चाने बांधून घेतले होते. मंदिराच्या सुरक्षा भिंत बांधकामाला जवळपास एक महिना पूर्ण झालेला आहे. संबंधित बांधकाम माजी आमदार बाळा भाऊ काशीवार यांच्या आमदार निधीतून २०२०-२१ या वर्षी मंजूर करण्यात आले होते. सुरक्षा भिंतीचे बांधकाम हे पूर्णत: झाले.
संबंधित सुरक्षा भिंतीला तडे गेलेले आहेत. सुरक्षा भिंतीची लोखंडी फाटक ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ताला लावल्यानंतरसुद्धा ती उघडी होते. मंदिराच्या मैदानाचे सपाटीकरणसुद्धा यामध्ये करण्यात आले नाही. संबंधित बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
यात सर्वस्वी एकोडी ग्रामपंचायत ही जबाबदार असून संबंधित ग्रामपंचायत व देखरेख करणारे अभियंते यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
तांत्रिकदृष्ट्या बांधकाम बरोबर असून अभियंत्यांनी त्याला मान्यता दिली आहे.
-भूमिता तिडके, सरपंच एकोडी