भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काेराेनाचा उद्रेक झाला. या महिन्यात दरराेज १२००च्या वर रुग्ण आढळून येेत हाेते. एकट्या मे महिन्यात ३३ हजार रुग्णांची नाेंद करण्यात आली. सर्वत्र हाहाकार उडाल्याची स्थिती हाेती. सर्व रुग्णालय हाऊसफूल हाेते. ऑक्सिजन खाट मिळविण्यासाठी धावपळ सुरू हाेती. रेमडेसिव्हिर इंजेक्शनही मिळत नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला हाेता. अशातच अनेकांचा मृत्यूही झाला. मात्र मे महिना उजाडला आणि रुग्णसंख्या कमी व्हायला लागली.
गत दहा दिवसांपासून तर रुग्णांची संख्या एकदम कमी झाल्याचे दिसून येत आहे. १८ आणि २० मेचा अपवाद वगळता रुग्णसंख्या १००च्या आत दिसून येत आहे. १६ मे राेजी ९६, १७ मे ७४, १९ मे ८६, २१ मे ८४, २२ मे ६२, २३ मे ८३ आणि साेमवारी २३ मे राेजी ५२ रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. यासाेबतच रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. गत काही दिवसांपासून मृत्यूचे आकडे पाचच्या आत दिसून येत आहे. काेराेना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याची ही चिन्हे आहेत.
बाॅक्स
९६ काेराेनामुक्त ५२ पाॅझिटिव्ह
भंडारा जिल्ह्यात साेमवारी ३१६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ३२, माेहाडी ५, तुमसर ३, लाखनी २, साकाेली ६ आणि लाखांदूर तालुक्यात ४ असे ५२ रुग्ण आढळून आले आहे, तर ९६ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. भंडारा आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
बाॅक्स
पवनीत साेमवारी रुग्ण निरंक
एप्रिल महिन्यात हाॅटस्पाॅट ठरलेल्या पवनी तालुक्यात साेमवारी काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या तालुक्यात आतापर्यंत ५९४१ रुग्ण आढळून आले असून १०३ जणांचा मृत्यू झाला. साेमवारने पवनी तालुक्याला माेठा दिलासा दिला.
बाॅक्स
५५ हजार ९७४ काेराेनामुक्त
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७७ हजार १९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५७ हजार ९९७ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५५ हजार ९७४ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ९७९ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण असून, काेराेनाने १०४४ जणांचा बळी घेतला आहे.