पवनी : तालुक्यातील चौरास पट्ट्यात धान उत्पादक शेतकरी आहेत. शेतावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे राईस प्लँटर हे आधुनिक यंत्र चौरास भागात उपलब्ध झाल्याने शेतकरी सुखावला आहे.पावसाळा सुरु झाला. परंतु पावसाचे प्रमाण कमी आहे. लोकांना पऱ्हे जगविण्यासाठी पाण्याची सोय करावी लागत आहे. कूबोटो कंपनीच्या यंत्रासाठी कमी पाणी वापरून ट्रे मध्ये तयार केलेले पऱ्हे रोवणीसाठी वापरले जात आहे. चौरास भागात आतापर्यंत ५० एकर शेतामध्ये राईस प्लँटरचे साहाय्याने रोवणी करण्यात आलेली आहे. धानाचे दोन रोपात शास्त्रशुद्ध पद्धतीने अंतर राखले जात असल्याने धानाचे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. रोवणी सुरु असलेल्या शेतामध्ये रोवणी करताना यंत्र पाहण्यासाठी कुतूहल म्हणून लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची सवय लोकांना लागावी यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी समूहाद्वारे परिसरात यंत्र उपलब्ध करून दिलेले आहे. भंडारा जिल्ह्यात हे एकमेव यंत्र असावे असे परिसरात बोलल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
मजुराशिवाय रोवणी करून उत्पन्न वाढविणार
By admin | Published: July 02, 2015 12:40 AM