इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल असलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा खाटेवरून खाली कोसळून मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेच्या मुलाने हा प्रकार सोशल मीडियातून उजागर केला. यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयातील या संतापजनक प्रकारामुळे कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहे.येथील खात रोड परिसरातील एका ६२ वर्षीय महिलेला ८ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता येथील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यावेळी महिलेला दाखल करण्यासाठी आकस्मिक उपचार कक्ष ते कोविड ब्लॉक यामध्ये तिच्या मुलाला अक्षरश: तीन ते चार वेळा पायपिट करावी लागली. आर्त विनवणी केल्यानंतर कोरोना ब्लॉकमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आपल्या आईची कारोना टेस्ट करावी असा आग्रह मुलाने केला. परंतु सकाळ पाळीतच कोरोना चाचणी केली जाते, असे सांगण्यात आले. रात्र झाली असल्याने व त्रास होत असल्याने या स्थितीत घरी कसे जायचे, त्यामुळे मुलाने पुन्हा एकदा विनवणी केली. कोरोना ब्लॉकमधून सामान्य वॉर्डात दाखल करण्यासाठी मुलाने प्रयत्न केले. शेवटी मुलाच्या विनंतीवरून कोरोना ब्लॉकमध्ये महिलेसाठी जमिनीवर गादी टाकण्यात आली. ९ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास मुलाच्या प्रयत्नाअंती जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल करण्यात आले.तत्पूर्वी त्या वृद्ध महिलेची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. विशेष म्हणजे आयसीयू कक्षात गेल्यानंतर तिला आराम होईल, अशी आशा मुलाला होती. परंतु या वॉर्डात तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. या वॉर्डात तिला एका खाटेवर ठेवण्यात आले होते. मात्र कोणीही तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते, असे मुलाचे म्हणणे आहे. याबाबत वॉर्डातील कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आले. महिलेचा आॅक्सिजन मास्क खाली पडला होता तर नळी सुद्धा निघाली होती. यावेळी लक्ष दिल्यानंतर ती पूर्ववत करण्यात आली.सायंकाळच्या सुमारास पुन्हा तिच समस्या दिसून आली. दुसऱ्या दिवशी महिलेला सुटी घेऊन अन्यत्र दाखल करण्याबाबत मुलाने प्रयत्न सुरू केले. गुरवार १० सप्टेंबरला सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुलगा आयसीयू कक्षात गेला. तेव्हा आई खाटेवरू खाली कोसळलेल्या स्थितीत दिसली. आरडाओरड करून यंत्रणेला पाचारण केले. तिथे उपस्थित असलेल्या वृद्ध महिलेच्या जावयानेही हा सगळा प्रकार बघितला. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केले. आयसीयू वॉर्डातच अशी यंत्रणा कार्यान्वित असेल तर सामान्य वॉर्डात व अन्य ठिकाणी काय दृश्य असेल याची कल्पना न केलेलीच बरी.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डासंदर्भात अलिकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे. येथे रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार होत नसून तेथील कर्मचारी कोणतेच सहकार्य करीत नसल्याचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सांगतात. एवऐच नाही तर कोरोना संबंधित वॉर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य असते. याठिकाणी सामान्य माणूस जावू शकत नाही. त्यामुळे येथील कारभार कसा सुरू आहे याची माहिती पुढे येत नाही.मृतदेह उचलण्यासाठी मागितले पाचशे रुपयेवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचे पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावेळी मृत महिलेच्या मुलाची स्वाक्षरी घेऊन डिस्चार्ज देण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. यावेळी आयसीयू कक्षातून मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये नेण्यासाठी दोन नर्स व एक वॉर्डबॉय मुलाजवळ आले. यावेळी ‘तुमच्या आईचा मृतदेह खाली अॅम्बुलन्सपर्यंत आणण्यासाठी किमान सहाशे रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावेळी मुलाने खिशात असलेली पाचशे रुपयांची नोट त्यांना दिली, असे मुलाने सांगितले. मृतदेह उचलण्यासाठी पाचशे रुपये मागणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांची मानवी संवेदना हरवल्याचे दिसून येते.रात्र जागून काढली कोवीड ब्लॉकमध्ये८ सप्टेंबरच्या रात्री वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर बेड न मिळाल्याने तिला कोविड ब्लॉकमध्ये खालीच झोपावे लागले. यावेळी गादी मिळाली असली तरी औषध देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महिलेला श्वास घेण्यात त्रास होत होता. एकीकडे प्रशासन आरोग्य सुविधांची परिपूर्ती केली जाईल, असे सांगत असले तरी हा निव्वळ बनाव असल्याचा अनुभव येथे आला.सोशल मीडियावर संतापआयसीयू कक्षात वृद्ध महिलेचा अशा स्थितीत मृत्यू झाल्याने व त्याची माहिती सोशल मीडियावर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मानवी संवेदना हरवलेल्या त्या संबंधित वॉर्ड यंत्रणेतील कर्मचाºयांना जाब विचारला पाहिजे, अशी टीका टिप्पणीही करण्यात येत आहे. घडलेल्या प्रकारावर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाºयांसह जिल्हाधिकाºयांनी ही लक्ष देणे महत्त्वाचे झाले आहे.सदर प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन संबंधित बाबी तपासून पाहण्यात येतील. जो कोणी दोषी असेल नक्कीच कारवाई करण्यात येईल.- संदीप कदम, जिल्हाधिकारीनागरिक कोरोनाने कमी आणि आरोग्य सुविधा न मिळाल्यानेच जास्त दगावत आहेत. वैद्यकीय अधिकाºयांनी विशेषत: शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठपणाने कर्तव्य बजावले पाहिजे. प्रकार पुन्हा कुणासोबतही घडू नये, हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना.- मृत महिलेचा मुलगा.पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रुग्णालयातजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील यंत्रणा ढेपाळल्याच्या तक्ररीत वाढ होत आहे. याठिकाणी दाखल रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्या. त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी संदीप कदम थेट पीपीई कीट घालून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिल्याने रुग्णालयाच्या यंत्रणेत खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबधित रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील व्यवस्थेबाबत चर्चा केली. रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. कोरोना संशयीत रुग्णवॉर्ड, कोरोना पुरूषाने महिला वॉर्ड तसेच अतिदक्षता विभागाला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. पीयूष जक्कल, डॉ. निखिल डोकरीमारे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना वॉर्डातील स्वच्छता, रुग्णांना दिले जाणारे जेवण, पिण्याचे गरम पाणी आदी व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तीक लक्ष देण्याची सूचना आरोग्य यंत्रणेला केली. तसेच कोरानाबाधित रुग्णांना घरून जेवणाचा डबा देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णांना भेटल्याचा आग्रह धरू नये. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून आपल्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येवू नये, असे ते म्हणाले.
आयसीयुमध्ये खाटेवरून पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 5:00 AM
याठिकाणी दाखल रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्या. त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी संदीप कदम थेट पीपीई कीट घालून जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिल्याने रुग्णालयाच्या यंत्रणेत खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबधित रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ठळक मुद्देवॉर्डातील यंत्रणेचे दुर्लक्ष : जिल्हा सामान्य रुग्णालयातील संतापजनक प्रकार, मृत महिलेच्या मुलाने फोडला टाहो