राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘त्या’ महिलेचे वय पासष्ठ दाखवा, मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे, पण ती रणरागिणी महिला तलाठी नन्नाचाच पाढा वाचते. तुम्हाला जे करायचे ते करा, माझी बदली करा, मी चुकीचे काम करणार नाही, असे खडसावून सांगते. नेत्याची बोलती बंद होते. असा ऑडिओ सध्या मोहाडी तालुक्यात चांगलाच व्हायरल होत असून एक जिल्हास्तरीय राजकीय नेता कर्मचाऱ्यावर कसा दबाव टाकतो याचे उदाहरण त्यात दिसून येते.हल्ली नेत्यांना मी म्हणतो तसेच झाले पाहिजे असे वाटते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा तो प्रश्न येतो. कुण्या अधिकारी-कर्मचाऱ्याने ऐकले नाही तर बघून घेण्याची भाषा निघते. अगदी असेच मोहाडी तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटात घडले. या नेत्याकडून चुकीचे काम करण्यासाठी दम देण्याबाबतचा ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका महिलेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्याने त्याचा खटाटोप सुरु आहे. त्यासाठी ५० वर्ष वयोगटातील त्या महिलेचे वय पासष्ठ दाखवा अशी त्यांची मागणी आहे.
त्यासाठी एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दाखलाही मिळवून घेतला. आता ते प्रकरण तलाठ्याला दिले. निराधार योजनेसाठी तलाठी यांचे प्रतिवेदन लागते. मुळात ती महिला पासष्ठ वर्षाची नाही. त्यामुळे मी खोटे प्रतिवेदन देऊ शकणार नाही, असे त्या महिला तलाठी सांगतात. यावरून चांगलीच शाब्दीक चकमक होते.मी १७ हजार लोकांचे नेतृत्व करतो. माझ्यासोबत वाद घालू नका, डॉक्टरांनी जेवढे वय लिहिले त्यानुसार लिहा, असा दम तो त्या महिला तलाठ्याला भरतो. परंतु कुठेही महिला तलाठी नमली नाही. तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तेथे करा, असे स्पष्ट सांगते. एका तलाठी महिलेचा हा रणरागिणी अवतार सध्या तालुक्यातच नव्हे तर भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे.वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या चौकशीची गरजमोहाडी तालुक्यात गत पाच वर्षातील संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना आदीतील लाभार्थ्यांची चौकशी होणे या निमित्ताने गरजेचे झाले आहे. अनेक जण असे प्रमाणपत्र मिळवून राजकीय वशिल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळवितात. मात्र खरे लाभार्थी यापासून वंचित राहतात.