वॉकथॉन आज : इंडियन आयडल फेम सुगंधा दाते राहणार उपस्थित भंडारा : गर्भलिंग निदानातून मुलींची भ्रुणहत्या, महिलांवरील अन्याय, महिलांच्या आरोग्याविषयी समस्या, किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर चर्चा करून जागृती करण्याच्या उद्देशाने प्रयास बहुउद्देशिय संस्था साकोलीच्या वतीने बुधवारला भंडारा येथे वॉकथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रयास संस्थेच्या अध्यक्ष प्रियंका वर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्या म्हणाल्या, गर्भवती महिलेच्या गर्भलिंग निदानावर कायद्यानुसार बंदी असूनही भ्रुणहत्या थांबलेल्या नाही. परिणामी मुलींची संख्या कमी होत आहे. शासनस्तरावर प्रयत्न करूनही महिलांमध्ये जनजागृती होत नसल्यामुळे व महिलांच्या अशिक्षीतपणामुळे या समस्या वाढत आहे. याला आळा बसावा यासाठी महिलांना जागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या आरोग्य विषयक समस्या, किशोरवयीन मुलींच्या समस्यांवर चर्चा करून जागृती करण्याच्या उद्देशाने प्रयास संस्थेच्यावतीने बुधवारला सकाळी १०.३० वाजता गांधी विद्यालय, लायब्ररी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान किशोरयवीन मुलींच्या ज्वलंत विषयांवर वॉकथॉन प्रकाश टाकणार आहे. यामध्ये महिलांचे सक्षमीकरण, बालमजुरी, बेटी बचाव, आरोग्य व स्वच्छता या दृष्टीनेही जागृती करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रयास ही संस्था सॅनेटरी व्हेडींग मशिन हा प्रोजक्ट राबवित असून महाराष्ट्रात प्रथमच असा प्रकारचा प्रोजेक्ट सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला व तरुणींनी आरोग्य व बचत गटातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आहे. वॉकथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे इंडियन आयडल ज्युनिअर फेम सुगंधा दाते या स्वत: बेटी बचाव या विषयाला घेऊन वॉकथॉनमध्ये सहभागी होणार आहे. यासाठी महिला बचत गट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका वर्मा, सचिव सुचिता आगाशे, हर्ष मोदी यांनी केले आहे. पत्ररिषदेला मंगला डहाके, मंगला कोल्हे, उषा लांजेवार, रेखा आगलावे, संध्या किरोलिकर, साधना त्रिवेदी, संगिता कापसे, रेखा पाठक, निलिमा भोवते, माया गभने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बेटी बचावसाठी महिला सरसावल्या
By admin | Published: July 13, 2016 1:39 AM