भंडारा : कोरोनाकाळात अनेकांचे हाल झाले. व्यवसायांचे तर होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेला पतीचा डीजेचा व्यवसाय कोरोनामुळे कायमचाच ठप्प पडला. अन् आगासे दाम्पत्याचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. ही व्यथा आहे तुमसर तालुक्यातील पांजरा येथील वंदना आगासे आणि पती धर्मराज आगासे यांची. कोरोनामुळे लग्न, विधी कार्यक्रमांवर बंदी आली होती. त्यामुळे सोळा लाख रुपये उभारून सुरू केलेला डीजे व्यवसाय कायमचाच बंद झाल्याने आता करावे काय, अशा चक्रव्यूहात आगासे कुटुंब सापडले होते. शेती नाही, गावात रोजगाराचे साधन नाही. अशात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित महिला बचत गटाच्या सदस्य तथा माविमच्या गावप्रतिनिधी असलेल्या वंदना आगासे हिंमत हरल्या नाहीत. कर्जाचे हप्ते थकल्याने त्या चिंतित होत्या. अशातच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, तुमसरच्या शक्ती लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मंदा साकोरे यांनी धीर दिला. त्यांना माविमने बारदाना निर्मिती शिलाई मशीन दिली. नवीन व्यवसायाचे आश्वासन मिळाल्याने वंदना आगासे यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पतीची साडेतीन लाखांची गाडी अवघ्या दीड लाखांत विकली. अन् बचत गटातील कर्जातून घराच्या छतावरच ३६ बाय १४ आकाराच्या जागेत कॉकरेल पक्ष्यांची निवड करून जून २०२० ला पोल्ट्रीफार्म सुरू केला. पहिल्याच बॅचमधून त्यांनी एक लाख २८ हजारांची विक्री केली. त्यातून खर्च वजा जाता साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. अशा त्यांनी सहा बॅचमधून खर्च वजा जाता साडेतीन लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मात्र हा व्यवसाय करतानाही त्यांना असंख्य अडचणी आल्या. घरची थोडीही शेती नाही, स्वतःच्या मालकीची जागाही नाही. मात्र व्यवसाय, कष्ट करण्याची जिद्द असल्याने त्यांनी आपल्या घराच्या छतावर कमी जागेत योग्य नियोजन करून पोल्ट्री फार्मला सुरुवात केली. यासाठी त्यांचे पती धर्मराज आगासे यांचीही त्यासाठी मदत होत आहे. आज पोल्ट्री व्यवसायात त्यांनी स्वतःचा इतका अभ्यास वाढविला आहे की परिसरातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. गावात रोजगाराची संधी नसल्याने व स्वतःच्या डीजे व्यवसायातून ३५ जण बेरोजगार झाल्याची जाणीव असल्याने ते आजही विनामूल्य मार्गदर्शन करतात. आज त्यांच्या प्रेरणेतून गावात पाच जणांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. वंदना आगासे या माविमच्या गाव प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्या सोबतच इतर महिलांनाही रोजगार, व्यवसायासाठी धडपडतात. त्यांच्या प्रेरणेतून व माविमच्या प्रशिक्षणांतर्गत गावातील इतर महिलांनीही शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, कोंबडी पालन व्यवसाय सुरू केले आहेत.
बॉक्स
संकट काळात माविमने दिला मोठा आधार
सोळा लाखांचे भांडवल गुंतवून उभारलेला डीजेचा व्यवसाय कोरोनाने बंद पडला. आता कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? अशा विवंचनेत असतानाच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काओळे, तुमसरच्या शक्ती संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मंदा साकोरे यांनी घरी भेट दिली. आस्थेने विचारपूस करीत बँकेकडे दबाव कमी केला. विश्वास वाढवला. वंदनाताई तुम्ही हिंमत हारू नका, नवीन कर्जासाठी मदत करून तत्काळ बारदाना मशीन उपलब्ध करून दिली. त्यातूनच अर्थार्जन सुरू झाले. आगासे यांनी २ जून २०२० ला घरीच सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायातून अवघ्या वर्षभरातच गगनभरारी घेतली आहे.
कोट
आम्ही झोपडीत राहत होतो. स्वत:ची शेती नाही की जमीन नाही. कोरोनाने पतीचा डीजेचा व्यवसाय कायमचा बंद पडला. मात्र कोरोनाकाळात सर्व काही संपल्यासारखे वाटत असतानाच माझ्यासह कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मला केवळ माविममुळेच मिळाली. याचीच जाणीव ठेवून इतर महिलांनाही व्यवसायाचे, रोजगारनिर्मिसाठी विनामूल्य मार्गदर्शन करीत आहे.
वंदना आगासे,
महिला व्यवसायिक तथा माविम प्रतिनिधी, पांजरा