मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिलेगाव अडीच लोकसंख्येचे गाव. गत पाच वर्षापासून गावात तिव्र पाणीटंचाई. पाणीसमस्या कशी सोडवावी अशा प्रश्न अशातच उच्च शिक्षित महिला सरपंचपदी विराजमान झाल्या. स्वत:च्या शेतात बोअरवेल खोदला. अडीच किलोमिटर जलवाहिनी टाकून गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरु केला. पाणीटंचाईवर मात करणाऱ्या महिला सरपंचाचे नाव आहे संध्या पारधी.तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत होता. महिलासह सर्वचजण पाण्यासाठी भटकंती करीत होते. प्रशासनाला अर्ज विनंती करुनही उपयोग झाले नाही. संपूर्ण गाव पाणी समस्या कशी सुटेल या विवंचनेत होते. अशातच थेट जनतेतून सरपंचपदी उच्च शिक्षीत संध्या पारधी निवडूण आल्या. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या होती. गावातील विहिरींनी तळ गाठला होता. इतर बोअरवेलही कोरड्या पडल्या होत्या. याची गंभीर दखल सरपंच संध्या पारधी यांनी घेतली. पती मुनिश्वर पारधी व ग्रामपंचायत सदस्यांसोबत चर्चा करुन पाणीसमस्या कायम दुर करण्याचे प्रयत्न सुरु केले. या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा कटरे यांची भेट घेतली. शेतशिवार ते गावापर्यंत जलवाहिनीसाठी जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. सुमारे अडीच किलोमिटर जलवाहिनीसाठी निधी मंजूर झाला. सरपंच संध्या पारधी यांनी दोन किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतात स्वखर्चातून बोअरवेल खोदली. तीला भरपूर पाणी लागले. शेतशिवारातून जलवाहिनीच्याद्वारे थेट सिलेगावला पाणीपुरवठा सुरु झाला. गत वर्षभरापासून विनामूल्य आणि नियमित पाणी पुरवठा केला जात आहे. सरपंच पारधी यांच्या दुरदृष्टीने गावकºयांची चिंता मिटली आहे.पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे प्रयत्नशेतातील बोअरवेलमुळे गावातील पाणी समस्या तात्पुरती दुर झाली. मात्र कायमस्वरुपी पाणी समस्या सोडविण्यासाठी पारधी दाम्पत्य प्रयत्नशील आहेत. शासनाच्या पाणीपुरवठा योजनेतून निधी मंजूर करण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतात बोअर खोदली. यासाठी पती मुनिश्वर पारधी यांची साथ मिळाली. जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे यांनी जलवाहिनीसाठी निधी मंजूर केला. सिलेगाव येथील पाणीटंचाईवर मात केल्याचे समाधान आहे.-संध्या पारधी, सरपंच सिलेगाव