गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेवर सिझेरियन करण्यात आले. शुद्धीवर आल्यापासून तिच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने येथील रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रुग्णालयात पोलिसांनचा बंदोबस्त असून नातेवाईकांच्या मागणीनंतर शवविच्छेदनासाठी प्रेत नापूरला रवाना करण्यात आले आहे.
वनिता विजय भिवगडे (२५, मुंडीपार/सडक ता. साकोली) असे या महिलेचे नाव आहे. दुसऱ्या बाळंपतपणासाठी तिला कुटुंबियांनी जुलैच्या सायंकाळी ४ वाजता प्रसुतीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी, २८ जुलैला सकाळी १०:०८ सिझेरियन आपरेशन करून प्रसुती करून बाळ जन्मले. ती शुद्धीवर आल्यावर पोटात प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. दरम्यान तिचा शनिवारी, २९ रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतपणीचा मृत्यू झाला असा आरोप यावेळी कुटुंबियांनी करून वैद्यकीय अधिक्षकांकडे चौकशीची मागणी केली. हे वृत्त शहरात कळताच नागरिकांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. यामुळे गर्दी व तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा ताफा तैनात करावा लागला.
शवविच्छेदानाठी प्रेत नागपूरला
तणावाची स्थिती बघता मृतक महिलेचे शव नागपूरला फॉरेन्सिक लॅबमध्ये शवविच्छेदनासाठी शनिवारी दुोारी १२:५५ वाजता रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करूनदोषी डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : मागणी
मृत महिलेचे पती विजय भिवगडे यांनी या प्रकरणी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. २८ जुलैला स. १०:०८ वनिता शुद्धीवर आली, पोटात फार दुखत असल्याचे सांगूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, आपल्या पत्नीच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रुग्णालयात पोलिस बंदोबस्त
या घटनेनंतर सुपारे १०० च्या वर संतप्त नागरिकांचा जमाव निर्माण झाला होता. रुग्णालयात महिलेचा मृत्यू होण्याची अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याचा नागरिकांचा आरोप होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी ताफ्यासह रुग्णालयात पोहचून तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी प्रेत नागपूरला रवाना केल्यानंतर जमाव पांगला व परिस्थिती शांत झाली.
महिलेचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर शवविच्छेदनाकरिता तातडीने शव नागपूरला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे, याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून चौकशीअंती नियमानुसार कारवाईसाठी वरीष्ठांना अहवाल सादर केला जाईल.
- डॉ. संदीपकूमार गजभिये, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, साकोली