वैशाली डोळस यांचे प्रतिपादन : सिल्लीत माई रमाई जन्मोत्सव साजराभंडारा : स्त्रियांना घरात डांबून ठेवणे हीच मुळ मनुस्मृती आहे. तेव्हा स्त्रियांनी बंधने नाकारली पाहिजे. आजची घरकाम करणारी स्त्री ही आदर्श स्त्री नसून पुरूष संस्कृतीची आदर्श गुलाम आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या प्रदेश प्रवक्त्या अॅड. वैशाली डोळस यांनी केले.सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमी येथे माई रमाई यांच्या १२० व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी केसलवाडा येथील ग्रामपंचायत सरपंचा हर्षविणा मेश्राम, विनोद विद्यालय सिल्ली येथील अध्यापिका चंद्रकला निखारे, सिल्ली येथील उपसरपंच आशा बारई, पंचायत समिती सदस्या प्रमिला लांजेवार, ग्रा. पं. सदस्या कुंदा माकडे, कांता मलेवार, सामाजिक कार्यकर्त्या वासंती सरदार, सिल्ली येथील जेष्ठ महिला नागरिक वंचळा मेश्राम आदी उपस्थित होत्या. अॅड. वैशाली डोळस म्हणाल्या, रमाई या शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्यात त्यागाची वृत्ती व काटकसर करणाऱ्या होत्या. त्यांच्या त्यागाचा वारसा आपण महिलांनी जोपासला पाहिजे. केवळ उपासतापास करण्यापेक्षा चार आदिवासी समाजाची मुले दत्तक घेवून त्यांना शिक्षित करा, फार मोठे समाधान लाभेल. रमाई अडाणी जरी असल्या तरी त्यांच्यात जगण्याचे तत्वज्ञान अधिक होते. रमाईच्या त्यागानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होवू शकले. माई रमाईसारखे आयुष्य कोणाच्याही वाट्याला येवू नये. मनुस्मृतीचा कायदा हा स्त्रीला विकण्याचा कायदा होता. स्त्री म्हणजे जणूकाही गोठ्यातील जनावरच अशी परिस्थिती होती. स्त्रीयांना कायदेशीर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. स्त्री ही पुरूषांची मैत्रीण असली पाहिजे, कारण ती सुद्धा या देशाची नागरिक आहे व तिलाही जगण्याचा अधिकार आहे. स्त्रीयांना घरात डांबून ठेवणे हीच मुळ मनुस्मृती आहे. तेव्हा स्त्रीयांनी बंधने नाकारली पाहिजे. कारण घरकाम करणारी स्त्रीही आदर्श स्त्री नसून पुरूष संस्कृतीची आदर्श गुलाम होय असे मला वाटते.त्या म्हणाल्या, स्त्रीयांना धर्मगुरू होण्याचा अधिकार हिंदू धर्म देत नाही. हा अधिकार अडीच हजार वषापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी दिला व स्त्रीयांचा माणूस म्हणून स्वीकार केला होता. त्यामुळे स्त्रीयांना केवळ एका जातीच्या बंधनात न बांधता त्यांचा व्यापक दृष्टीने विचार करण्यात यावा कारण डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलात विशिष्ट समाजाच्या स्त्रियांसाठी अधिकार दिले नसून सर्व समाजातील स्त्रियांना अधिकार देवून स्वावलंबी बनविले, असा मार्मिक मार्गदर्शन आपल्या भाषणातून डोळस यांनी केला. तसेच प्रमुख अतिथी चंद्रकला निखारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरूपासून वैचारिक मुल्यांची जोपासना केली असून आईचा संस्कार हा महत्वाचा असतो तो संस्कार जीजाऊने शिवरायांना दिला नसता तर लोकराजा शिवराया निर्माण झाला नसता, बाबासाहेबांनी कोणताही मोर्चा न काढता मताधिकाराचा अधिकार संविधानातून दिला. त्यामुळे हाच आपला राष्ट्रीय ग्रंथ असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. धम्मपीठावर उपस्थित हर्षविणा मेश्राम यांनी सुद्धा रमाईची महती सांगून आजच्या युगात स्त्रीयांनी कसे जगावे, कसे वागावे, कसे आचरण करावे याबाबत संदेश दिला. संचालन विलास खोब्रागडे यांनी केले. आभार बौद्ध विहार समितीचे सचिव विवेक गजभिये यांनी केले. दरम्यान बौद्ध विहार परिसरात महाभोजनदान देण्यात आले. कार्यक्रमासाठी देवांगणा गजभिये, शालीना हुमणे, पोर्णिमा गजभिये, सारीका रामटेके, पुष्पा हुमणे, निराशा गजभिये, सुनिता गजभिये, चंद्रकला हुमणे, पंचफुला मेश्राम, सुप्रिया मेश्राम, संगीता गोस्वामी, बेबीनंदा गजभिये, ममता मेश्राम, ममता वैद्य, जनाबाई बडगे, विणा मेश्राम, शालू गजभिये, प्रिया भोयर, हिरा गजभिये, रिता मेश्राम, मनोरमा सरादे, पुष्पा तिरपुडे, रंजना गजभिये, चांगुना बागडे, डहाकेताई, रत्नमाला गजभिये, सिंधूताई मेश्राम, गीता मेश्राम, लतिका हुमणे, दमयंता बन्सोड, सलिन सरादे, सोनल बोरकर, करीश्मा हुमणे, पायल हुमणे, सोनी हुमणे, निकीता हुमणे, साची रामटेके, दिक्षा हुमणे, दिपा मेश्राम, शिवानी मेश्राम, संध्या जांगळे, शोभा मेश्राम, बेबी मेश्राम, सरोज मेश्राम, रंजना मेश्राम, वर्षा रामटेके, दिपा गजभिये तसेच समस्त महिला, तरूणींनी व मुस्कान बन्सोड, सुकेसनी सरादे, पायल मेश्राम, प्रगती मेश्राम, टीना मेश्राम, आराधना मेश्राम, अश्मी सरादे, राशी मेश्राम व अरिहंत किरण गजभिये, साहिल संजय मेश्राम, आदींनी मोलाचे सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
महिला ही पुरूष संस्कृतीची आदर्श गुलाम
By admin | Published: February 14, 2017 12:22 AM