चिखलीत चार महिन्यांपूर्वी दररोज नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्यानंतर गावातील बोअरचे पाणी अचानक कमी झाल्यापासून गावात पाणी टंचाई सुरू आहे. मात्र, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी समस्येकडे लक्ष दिलेले नाही. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे अद्याप पाणीटंचाईची समस्या सुटू शकलेली नाही. त्यामुळे गावातील निखिल वाघमारे, लीलाधर हटवार, कृष्णा वाघमारे, रोहित चरडे, वैभव गायधने, श्रीकांत कुंभलकर, तापेश्वर वाघमारे, वैभव मेहर, पंकज गंगारे, भारत वाढवे या तरुणांसह गावातील महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना धूळखात पडली आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करीत आहेत. पिण्याचे पाणी कोठून आणावे, असा प्रश्न महिलांसमोर कायम आहे. चिखली गावात काही दिवसांपूर्वी कंटेन्मेंट करण्यात आले होते. मात्र, त्याही परिस्थितीत गावकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत होतीच. तरीही ग्रामपंचायतीने कोणताही मार्ग काढलेला नाही. लोकांचा जीव गेल्यावर पाण्याची सोय करणार काय, असा आरोप चिखली येथील युवा कार्यकर्ता आकाश वाघमारे यांनी केला आहे. पिण्याचे पाणीच जर गावकऱ्यांना मिळत नसेल तर बाकी सुविधा कशा मिळणार, असाही आरोप होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित करावा व गावकऱ्यांची पाणी समस्येतून सुटका करावी, अशी मागणी केली आहे.
बॉक्स
कोरोना वाढण्याची भीती
चिखली हे गाव भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. गाव लहान असले तरी येथील शेतकऱ्यांनी उपक्रमशील, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याने राज्य व जिल्हास्तरावर चिखली गावाचा नावलौकिक झाला आहे. गावची अध्यात्मिक परंपरा ही मोठी आहे. सुशिक्षितवर्गाचेही प्रमाण जास्त असल्याने अनेकांना नोकरी निमित्ताने वेळेत जाण्यासाठी पाणी समस्या अडसर ठरत आहे. एकाच ठिकाणी पाण्यासाठी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी बीडीओ नूतन सावंत यांच्याकडे केली आहे.
मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
कोट
गावात गेल्या चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे अनेक महिला संतप्त झाल्या आहेत. पाणी समस्या तत्काळ सोडवण्याची आमची मागणी आहे.
आकाश वाघमारे,
युवा कार्यकर्ता, चिखली