विनिता साहू यांचे प्रतिपादन : महिला पोलिसांकरिता मदर्स डे चे आयोजनभंडारा : दैनंदिन जीवनात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पूर्वी चुल आणि मुल अशी जबाबदारी महिलांवर पुरुषप्रधान संस्कृतीने थोपवली होती. मात्र आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. शासकीय सेवा करत असताना महिलांनी दैनंदिन जीवनात शिस्त व कायद्याचे पालन करावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले. पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित मदर्स डे कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला परनित कौर (भाप्रसे), सुधा तिवारी, डॉ.नम्रता सरोदे, अंकीता बेहरा, डॉ.ज्योती कुकडे उपस्थित होते. यावेळी साहू म्हणाल्या, महिलांना पारिवारिक अडचणी येत असतात. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नि:संकोचपणे माहिती दिली पाहिजे. महिलांनी स्वत:सोबतच कुटुंबाच्या आरोग्याची काळजीही घेणे गरजेचे आहे. तणावाच्या परिस्थितीपासून दूर राहिल्यास कौटुंबिक जीवनही सुखी व समाधानी राहते. यावेळी डॉ.सुधा तिवारी म्हणाल्या, समाजामध्ये मानसिक अशांती निर्माण झाली आहे. त्याकरिता चांगल्या गोष्टींचा विकास करून नवीन संस्कारक्षम पिढी तयार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ.नम्रता सरोदे यांनी माता व मुल यांचे घनिष्ठ संबंध कसे आहे याबाबत मार्गदर्शन केले. महिला व पुरुष समानता असायला पाहिजे, निसर्गाने त्यांची रचना वेगवेगळी केली असली तरी पुरुषांच्या बरोबरीचे काम महिला करीत असल्याचे प्रतिपादन केले. अंकीता बेहरा यांनी महिलांनी कार्य करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे.डॉ.कुकडे यांनी स्त्री शक्ती ही खरोखरच शक्ती आहे. मुली जन्माला आल्यास समाजात आनंदोत्सव साजरा होत नाही. मात्र मुलाचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा बंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. परनीत कौर म्हणाल्या, महिलांनी स्वयंरोजगारातून स्वत:ला स्वावलंबी बनवावे व यातूनच कुटुंबाचीही प्रगती साधता येईल असे प्रतिपादन केले. यावेळी भंडारा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चाफले, पोलीस उपनिरीक्षक आडे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मंदा ठवरे, मंदा वाघमारे, प्रिती हलमारे, सुनंदा खोब्रागडे, शालू चंद्रिकापुरे, तारकेश्वरी चामट, सिंधू गुरनुले, अपेक्षिनी गजभिये यांनी सहकार्य केले. संचालन योगिनी नाकतोडे यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक चाफले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
महिलांनी दैनंदिन जीवनात शिस्त पाळावी
By admin | Published: May 11, 2016 12:51 AM