जया सोनकुसरे यांचे प्रतिपादन : गणेशपूर ग्रामपंचायत येथे महिला मेळावाभंडारा : महिलांनी आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी. पुरुषांवर अवलंबून न राहता स्वत:च्या व कुटुंबाच्या प्रगतीच्या वाटचालीच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा. महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाची प्रगती होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग तथा गणेशपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गणेशपूर ग्रामपंचायत तंटामुक्त समिती सभागृहात गुरुवारला आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, सरपंच वनिता भुरे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा साकुरे, माजी सरपंच माधुरी देशकर, मृणाल मुनेश्वर, प्रिया सहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सोनकुसरे यांनी कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही यासाठी समाजातील महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही प्रतिपादन केले. सरपंच वनिता भुरे यांनी महिला चूल आणि मूल सांभाळण्यासोबतच प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. त्यामुळे महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.मेळाव्यात महिलांचे आरोग्य शिबिर, पाककलाकृती व गणेशपूर येथील ज्या मुलामुलींनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक केले अशांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत गणेशपूरने आर्थिक सहकार्य केले. दरम्यान, महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला कोरंभी महिला सरपंच वनवे, बेला येथील सरपंच शारदा सेलोकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी तामगाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. कावळे यांच्यासह आंगणवाडी सेविका व महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदागवळी, संध्या बोदेले, दामिनी सडमते, सुभद्रा हेडाऊ, सुधा चवरे, मधुबाला बावनउके आदींनी सहकार्य केले. संचालन मेंढे यांनी केले तर आभार बोदेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
महिलांनी स्वयंरोजगाराची कास धरावी
By admin | Published: March 20, 2016 12:45 AM