सामूहिक अत्याचार प्रकरण : मनोधैर्यातून मिळणार आर्थिक मदतभंडारा : लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची मोबाईलने काढलेली चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली. आयोगाच्या सदस्या निता ठाकरे यांनी आज पीडिता व तिच्या कुटुंबियांची लाखांदूर येथे जाऊन भेट घेतली. दरम्यान पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक यांना दिले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीला बळजबरीने लगतच्या जंगलात नेऊन पाच तरूणांनी तिच्यावर आळीपाळीने सामुहिक अत्याचार केला. ही घटना २५ फेब्रुवारीला घडली. दरम्यान पाचही तरूणांनी पीडित मुलीला याबाबत कुणालाही न सांगण्याचे सांगून तसे केल्यास अत्याचाराची काढलेली चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. तिच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे धास्तावलेली पीडिता व तिच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही. दरम्यान या अत्याचाराची चित्रफित ‘लोकमत’च्या हाती लागताच वृत्त प्रकाशित केले. यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या गंभीर प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली. आज शुक्रवारला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे यांनी पीडिता व तिच्या कुटुंबियांची लाखांदूर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी लाखांदूरचे पोलीस निरीक्षक भोयर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दाबेराव, नागपूर-भंडारा जिल्ह्याचे समन्वय अनिल रेवतकर, वैशाली केळकर, मनोधर्याच्या मनिषा मुनेश्वर, कोंडेवार आदी उपस्थित होत्या. यावेळी निता ठाकरे यांनी, पीडिता व तिच्या कुटुंबियांची सांत्वना करून धीर दिला. पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना समाजातील नागरिकांच्या वाईट नजरेतून आत्मसन्माने जीवन जगता यावे, यासाठी पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक भोयर यांना दिले. (शहर प्रतिनिधी)
बाळापूरचे आमदार आज भंडाऱ्यातपीडित मुलीला न्याय मिळावा व तिच्या कुटबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वना देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बळीराम सिरस्कर हे शनिवारला सकाळी १० वाजता भंडारा येथे येत आहे. यावेळी ते समाजबांधवांच्या एका सभेला मार्गदर्शन केल्यानंतर ते लाखांदूरला जाणार आहेत. त्यांच्यासोबत माळी महासंघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे राहणार आहेत.पीडिता व तिचे कुटुंब धास्तावलेले आहे. त्यांना पोलीस संरक्षक देण्याचे निर्देश ठाणेदारांना दिले आहे. पीडितेच्या कुटुंबियांची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. मुलगी दहावीची परीक्षा देत असल्याने परीक्षा केंद्रावर जाताना तिला गावातील नागरिकांकडून त्रास होऊ नये याची खबरदारी पोलीस व महिला आयोग घेणार आहे. पीडितेला मनोधर्या योजनेतून तीन लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली असून ही रक्कम मिळणार आहे.- निता ठाकरे, सदस्य महाराष्ट राज्य महिला आयोग.