वरठी येथील प्रकार : ग्रामपंचायतने नाकारली परवानगीवरठी : मोबाईलच्या कंपनीच्या फोर-जी मोबाईल टॉवर बांधकामाविरोधात नेहरु वार्ड येथील नागरिकांनी एल्गार पुकारला आहे. मोबाईल टॉवरचे बांधकाम नागरिकांनी बंद पाडले असून सदर टॉवर गावाबाहेर हलविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.नेहरु वॉर्डातील विलास भाजीपाले यांच्या वरठी-तुमसर रस्त्यावर लोकवस्तीत असलेल्या खुल्या जागेवर या टॉवरचे बाधंकाम सुरु झाले होते. या परिसरात २०० च्या नागरिकांची वस्ती वस्ती आहे. ५०० मीटरच्या अंतरावर जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि रेल्वे स्थानक आहे. मोबाईल टॉवर तयार झाल्यास त्यापासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे येथील नागरिक व विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल टॉवर अंतर्गत निघणाऱ्या तरंग २४ तास मानवी प्रकृतीवर हल्ला चढवतात. यामुळे मानवी जीवनच नाही तर पशु, पक्षी आणि जनावर याबरोबर पर्यावरणास धोका आहे. संशोधनानुसार मोबाईल द्वारा उत्पन्न घेणाऱ्या तरंगामुळे ब्रेन हॅमरेज, कॅन्सर, झोप न येणे, स्मरणशक्ती कमी होणे, कर्करोग यासह अनेक आजार जडतात हे सिद्ध झाले आहे. या भागात सदर टॉवरचे बांधकाम सुरु आहे. त्याच्या २०० मीटर परिसरात दाट लोकवस्ती आहे. दीवस भर या भागात शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्रवासी व रुग्णाची रेलचेल राहते. सदर टॉवर तयार झाल्यास या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. सदर बांधकाम बंद करून मोबाईल टॉवर इतरत्र गावाबाहेर हलवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आज २०० लोकांनी ग्राम पंचायत येथे मोर्चा नेला होता. बाधकाम न हलवल्यास आंदोलन करण्याची चेतावनी देण्यात आली आहे. यावेळी वंसता ढेंगे, जितेंद्र घोडसेलवार, गोपाल माडंवे, नितेश चकोले, योगेश बन्सोड, राजेश ईश्वरकर यांच्यासह ३०० च्या वर महिला उपस्थित होते. (वार्ताहर)
मोबाईल टॉवर बांधकाम विरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 12:45 AM