भुयार येथील प्रकार ग्रामसभेत ठराव घेण्यासाठी महिलांनी केले प्रशासनाला बाध्यभंडारा : व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या पुढाकारातून बहुतांश गावात दारुबंदी झाल्याचे चित्र आहे. असे असताना भंडारा जिल्ह्यातील टोकावर असलेल्या भुयार या गावात चक्क महिलांनीच दारू दुकान सुरू करा, यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन दिले. त्यानंतर ग्रामसभेत ठराव पारित करून घेतला. महिलांनी दारू दुकान सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी.चंद्रपूर व उमरेड मार्गावरील भंडारा जिल्ह्यातील भुयार या तीन हजार लोकवस्तीच्या गावातील हे प्रकरण आहे. राज्य मार्गावर वसलेल्या या गावात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिटनुरवार यांनी देशी दारू दुकान सुरू करण्याची परवानगी मागितली. त्यांच्या दुकानासाठी गावातील सुमारे २५० ते ३०० महिलांनी पुढाकार घेतला.राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ दारुबंदी केली आहे. त्यामुळे तेथील दारू व्यावसायिक अन्य जिल्ह्यात दारूचे दुकान सरु करीत आहेत. त्यातच सावली तालुक्यातील चिटनुरवार यांनी भुयार हे गाव केंद्रस्थानी असल्याचे लक्षात घेऊन या गावात दारू दुकान सुरू करण्यासाठी ग्रामस्थांशी संधान साधले. महिलांना हाताशी धरून पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न केले. २६ जानेवारीच्या विशेष ग्रामसभेत देशी दारूचे दुकान सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला. महिलांच्या पुढाकारातून हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. विशेष म्हणजे या ग्रामसभेपूर्वी २०० ते २५० महिलांच्या स्वाक्षरीने सदर दुकानाच्या परवान्याचा विषय ग्रामसभेत ठेवण्यात यावा व त्याची नोंद प्रोसेडींगवर घेण्याचा विनंती अर्ज महिलांनी ग्रामपंचायतला दिला होता. दरम्यान दारू दुकानाला ८० लोकांनी विरोध करून परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले होते. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्या सभेत महिला व पुरुषांनी हात वर करून व उभे राहून दारु दुकान सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी असा ठराव पारित केला. दारु दुकानाला परवानगी द्या, यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची घटना बहुधा पहिल्यांदाच घडलेली असावी. (शहर प्रतिनिधी)चंद्रपूर जिल्ह्यातील चिटनुरवार यांच्या दारु दुकानाला परवानगी द्यावी, असे निवेदन गावातील महिलांनी १२ जानेवारी पूर्वी दिले होते. सदर दुकान निष्ठी मार्गावरील श्रावण मंगरू आठमांडे यांच्या घरी सुरू करणार असून ते चिटनुरवार यांनी किरायाने घेतले असून हा ठराव बहुमताने पारित झाला आहे. -एस.व्ही. भटकर, ग्रामविकास अधिकारी, भुयार
तिथे महिलांचे हात सरसावले दारू दुकानासाठी!
By admin | Published: February 02, 2016 12:27 AM