शिवनी ग्रामपंचायतीचे सहकार्य : स्वच्छता अभियानातून दिला जनजागृतीचा संदेशभंडारा : स्त्री शिकली म्हणजे संपूर्ण कुटूंब शिकते, अशी म्हण प्रचलित आहे. या म्हणीला साजेशे काम लाखनी तालुक्यात शिवनी येथील महिला करीत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ग्रामीण विकासामध्ये महिलांचे योगदान महत्वाचे माणून महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी गावाला सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने लाखनी तालुक्यातील शिवनी ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत अभियानात सहभाग घेतला आहे. या अनुषंगाने १ आॅक्टोबरला शिवनी येथे महिलांच्या पुढाकारातून महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियन राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवनी हे गाव हागणदारीमुक्त आहे. या गावाला साजेसे असे सुंदर व निरोगी गाव करण्यासाठी या सभेतून महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील मुख्य रस्त्याने महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साने गुरूजी यांची प्रतिकात्मक वेशभूषा करून प्रभातफेरी काढण्यात आली व या माध्यमातून ग्रामस्थांची जनजागृती केली. ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, साने गुरूजी स्वच्छ शाळा स्पर्धा, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा, शाहु-फुले-आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा स्पर्धा गावात राबविण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला. सरपंच माया कुथे, उपसरपंच सतीश शेंडे, ग्रामसचिव जयंत गडपायले, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर, सदस्य गिता शेंडे, रेखा लांडगे, रत्नमाला खांडेकर, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, पोलीस पाटील रोहिदास कुनभरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राघो शेंडे, देवस्थान समितीचे पदाधिकारी, जागर मंडळाचे सदस्य, बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, युवक मंडळाचे सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, महिला सुरक्षा दलाचे सर्व सदस्य, गावातील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक आशा वर्कर, ग्रामस्थ आदी सहकार्य करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
सुंदर, निरोगी गावासाठी महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 12:51 AM