भंडारा : राज्यात गत तीन महिन्यांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारने पुढाकार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर व कमी व्हावे यावर आमचे कार्य सुरू असून, महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा असल्याची प्रखर भूमिका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी मांडली. भाजप महिला मोर्चाच्या राज्यप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बुधवारी भंडारा जिल्ह्यात आगमनानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख इंद्रायणी कापगते, रचना गहाणे, चैतन्य उमाळकर, माजी नगरसेवक रूबी चढ्ढा, आशु गोंडाणे व पदाधिकारी उपस्थित होते. चित्रा वाघ म्हणाल्या, भाजप अंतर्गत महिलांचे पक्ष संघटन बळकटीकरणावर आमचा भर आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो; परंतु महिला, भगिनी, तरुणी ह्या सुरक्षित असल्या पाहिजे. भयमुक्त व भीतीमुक्त महाराष्ट्र घडवण्यावर शिंदे-फडणवीस सरकारची प्रमुख भूमिका आहे. गत तीन महिन्यांत जिथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामधील संबंधितांवर लगेच कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच्या सरकारने विविध घटनांवर डोळेझाकपणा करून महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी, त्यानंतर नंदुरबार, पुणे व मंत्रालयात घडलेल्या घटनांचा उल्लेख घेत चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात कुठल्याही बाबतीत महिलांवरील अत्याचार आम्ही खपवून घेणार नाहीत. जिथे गरज असेल त्यांना आम्ही मोलाची साथ देऊ असेही त्या म्हणाल्या. विधानसभा व विधान परिषदेत भाजप जास्तीत जास्त जागा कसे जिंकेल याकडे आमचे लक्ष आहे. यासाठी महिला मोर्चाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना कमीत कमी चार पदे देण्यात यावी, अशी आमची आग्रही भूमिका आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या.
जिल्हास्तरावरील प्रश्नांकडे मी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना म्हणाल्या, माझी लढाई अजूनही संपलेली नाही. याप्रकरणी न्यायालयात पीआयएल दाखल केली असून न्यायालयावर माझा संपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.