गैरप्रकार : तामसवाडी मार्गावरील शेतजमीन अकृषक झाल्याची चौकशी तुमसर : बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प वितरिका बांधकामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वितरिकेची कामे रखडली आहे. तुमसर शहराजवळील रेडझोन मध्ये येणाऱ्या जमिनी अकृषक करण्यात आल्या. वास्तविक प्रकल्पाचे काम १९९४ मध्ये सुरू झाले होते. सन १९९० नंतर यासर्व जमिनी अकृषक करण्यात आल्या. सन २०१६ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अधिकाऱ्यांसमोर येथे पेच निर्माण झाला आहे.तामसवाडी रस्त्यावर मांगली, खापा या परिसरातील वितरिका तयार करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहे. तुमसर-देव्हाडी मार्गावर वितरिकेवरील तीन मोठे पूल सुमारे दोन कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आले. वितरिकेचे भीजत घोंगडे आहे. सन १९९० च्या सुमारास तामसवाडी रस्त्यावर कृषीची शेती अकृषक करण्यात आली. नंतर हे भूखंड विक्री करण्यात आले. येथूनच बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकांचे जाळे विस्तारले आहे. वितरिका कुठून तयार करावी, असा प्रश्न प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर येथे उभा आहे. देव्हाडीसह चारगाव, नरेवाडा, बोरी, भागडी, तुमसरसह शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीला या रखडलेल्या वितरिकेच्या कामामुळे सिंचनाची सोय होत आहे. सन २०१६ मध्ये संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य शासनाने प्रकल्पाच्या वरिष्ठांना दिली. सन २०१४ व सन २०१५ मध्ये या प्रकल्पातून सुमारे ११ हजार ५०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता, प्रकल्प संचालक व कार्यकारी अभियंता रखडलेल्या वितरिके संदर्भात पुढील महिन्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. अकृषक जमिनीची येथे पाहणी केली जाणार असल्याचे समजते. मागील एक महिन्यापासून प्रकल्पाच्या शिल्लक कामांची कार्यकारी अभियंता ए.एस. गेडाम यांनी संपूर्ण पाहणी करून अहवाल तयार केला. गोसेखुर्द प्रकल्प पाहणीकरिता आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा संबंधित खात्याच्या सचिवांना अहवाल व प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. प्रकल्पाची घोषणा झाल्यावर तथा प्रत्यक्ष कामे सुरू झाल्यावर नकाशातील मार्गातील वितरिका शेती अकृषक करता येत नाही हे विशेष. येथे नियम धाब्यावर बसविण्यात आले, असे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
‘रेड झोन’मधील वितरिकेची कामे रखडली
By admin | Published: October 08, 2015 12:25 AM