रेल्वेकडून अद्याप निविदा नाही : बायपास रस्ता धोकादायक, निधीची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील अडीच वर्र्षापासून देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे बांधकामाच्या निविदा काढणार होते, परंतु अद्याप त्यांना मुहुर्त सापडला नाही. अपघाताला आमंत्रण देणारा हा उड्डाणपुल ठरत आहे. शासनाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. उड्डाणपुलावर प्रभूकृपा होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.दक्षिण - पूर्व रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुल प्रस्तावित करण्यात आला आहे. रेल्वे तथा राज्य सरकार येथे संयुक्तरित्या उड्डाणपुल तयार करीत आहे. रेल्वे ट्रॅकवरील ७० मिटरचे बांधकाम रेल्वे प्रशासन करणार असून आतापर्यंत कामाच्या निविदा रेल्वेने काढल्या नाहीत. रेल्वे प्रशासन एप्रिल महिन्यात निविदा काढणार होती. निविदा न काढल्याने उड्डाणपुलाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर - रामटेक - गोंदिया राज्य मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता येथे उड्डाणपुलाला मंजूरी प्रदान करण्यात आली होती. सध्या राज्य शासनाचे बांधकाम खाते एप्रोच (पोहच) रस्ता तयार करीत आहे. तुमसर मार्गावरील भरावचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर गोंदिया मार्गावर भरावची कामे सुरु आहेत. परंतु कामाचा वेग अतिशय मंद आहे. मागील अडीच वर्षापासून ही कामे सुरु आहेत. निधीअभावी येथे कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. रेल्वेची निविदा केव्हा निघणार याविषयी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगायला तयार नाही. रेल्वेच्या निविदेकरिता ‘प्रभू’ कृपेची प्रतीक्षा करावी लागत आहे. नागपूर येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आले होते. तेव्हा उड्डाणपुलाबाबत आशा होती. परंतु याबाबत समस्या कुणीच मांडली नसल्याची माहिती आहे. रेल्वेचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने राज्य शासनाचे कामे कासवगतीने सुरु आहेत. वर्दळीचा राज्य मार्ग असल्याने येथे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होते. एप्रोच रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता निमूळता आहे. निमूळत्या रस्त्यावर वळणमार्ग आहे. बायपास रस्त्यावर खड्डे पडणे सुरु झाले आहे. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रात्री येथे पथदिव्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी केंद्र तथा राज्य शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याची गरज आहे. तिरोडा येथील अदानी वीज कारखान्यातील अॅश एप्रोच रस्त्यावर भराव म्हणून घालण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात ही अॅश येथे वाऱ्यासोबत हवेत पसरत असून डोळे व श्वसनाचे आजार येथे बळावित आहेत. उड्डाणपुल कामाची गती येथे वाढविण्याची गरज आहे. अशीच कामाची गती राहिल्यास किमान चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. देव्हाडी - गोंदिया रस्त्यावर काही ठिकाणी विजेच्या खांबामुळे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येते. बायपास रस्त्यावर बारीक गिट्टीची चुरी टाकण्यात आली. यावरून दुचाकी घसरल्याच्या घटना दररोज घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
देव्हाडी उड्डाणपुलाचे काम संथगतीने
By admin | Published: May 15, 2017 12:35 AM