लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकोली शहरात उड्डाणपुलाचे निर्माण कार्य कासवगतीने सुरू आहे. निर्माणाधीन कंपनीकडून सुरक्षिततेची उपाययोजना न राबविल्यामुळे नागरिकांना अपघातसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कंपनी प्रबंधनाच्या वेळकाढू धोरणामुळे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य नियोजित कालावधीमध्ये झाले नसून त्याचा फटका वाहतुकीवर पडत आहे. शहरातील महामार्गावरील वाहतुकीदरम्यान नागरिक लहान-मोठ्या अपघातास बळी पडत आहेत.साकोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून उपविभागीय स्तरावरची अनेक कार्यालये तिथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण परिसरातले सर्वसामान्य नागरिक लहान-मोठ्या वाहनाने ये-जा करीत असतात. शहरातील वाहतूक व्यवस्था अपघात विरहित रहावी याकरिता उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने उड्डाणपुलाच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली. निर्माण कार्य सुरू असताना कंपनी प्रबंधनाच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व्हिस रोडवरील वाहतूक व्यवस्था एकेरी करण्यात येते. त्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. सर्व्हिस रोडवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. यात अनेकांना अपंगत्व आल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असताना शहरातील चौकांमध्ये कंपनी प्रबंधनाच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते व अपघात घडण्याची शक्यता नेहमी कायम राहते. उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यामध्ये अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. नागरिकांना सोयीस्कर वाहतूक करता यावी याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या नियमांना डावलून कंपनी प्रबंधन मनमर्जीरित्या निर्माण कार्य करीत आहे. साकोली शहरातून छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात ये-जा करण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागझिरा नवेगावबांध पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांचीसुद्धा वर्दळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते. उड्डाणपुलाच्या निर्माण कार्यामुळे सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या नाल्या उघड्या असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. बोदरा फाटा ते सेंदुरवाफा पर्यंत सुमारे दोन किमी लांब महामार्गावर शहर दोन्ही बाजूला वसलेले आहे.निर्माण कार्यामुळे जड वाहतुकीसह लहान वाहनांना वाहतुकीकरिता अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. निर्माण कार्य करताना कंपनी प्रबंधनाच्या माध्यमातून वाहतुकीसंबंधित सुरक्षितता बाळगण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच निर्माण कार्य लवकर व्हावे व सर्व्हिस रोडची दुरुस्ती योग्य व्हावी अशी मागणी आहे.
दोन वर्षांचा कालावधी झाला पूर्ण- दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही उड्डाणपुलाचे कार्य पूर्ण झाले नाही. उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने शहरातील वाहतुकीसंबंधात अनेक समस्या निर्माण होत आहेत. सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.