महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील वाहतुकीला ब्रेक
तुमसर: आंतरराज्य बावनथडी नदीवरील पुलाला हादरे बसत असल्याने सर्वाधिक बांधकाम खात्याने पुलावरील वाहतूक बंद केली. पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे खोदून वाहतूक बंद करण्यात आली. मागील पाच महिन्यापासून हा पूल बंद आहे. त्यामुळे मध्य प्रदेशकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, अजूनही पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. किमान नदी पात्रात रपटा तयार करण्याची गरज आहे.
आंतरराज्यीय बावनथडी नदीवरील पुलाला हादरे बसत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग तुमसरने पुलावरील वाहतूक बंद केली. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर खड्डे खोदून वाहतूक रोखण्यात आली. सध्या बपेरा मार्गाने वाहतूक सुरू आहे. परंतु वाहनधारकांना २५ ते ३० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. पुलाला हादरे बसत असल्याने पूल दुरुस्तीचे काम करण्याचे सांगण्यात आले. परंतु पाच महिन्यापासून पुलाची दुरुस्ती सुरू करण्यात आली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर काम हे कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दुरुस्तीला अजून किती दिवस लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
तात्पुरता रपटा तयार करावा
बावनथडी नदीवरील पूल सुमारे ३५ वर्षांचा झाला आहे. त्यापूर्वी पावसाळा संपल्यानंतर नदीपात्रात आंतरराज्य वाहतुकीकरिता रपटा तयार करण्यात येत होता. सध्या पुलावरील वाहतूक बंद असल्याने तात्पुरत्या वाहतुकीकरिता नदीपात्रात रपटा तयार करण्याची मागणी होत आहे. सदर रपट्याकरिता अडीच कोटी रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याकरिता अडचणी येत असल्याचे समजते. संबंधित विभागाने रपटा तयार करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचे समजते. परंतु याला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही, अशी माहिती आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आंतरराज्य पूल वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे, याची माहिती दिली नाही. तसेच रस्त्यावर खड्डे खोदून वाहतूक बंद केली. संबंधित विभागाने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी. तत्पूर्वी रपट्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे
कोट बॉक्स
बावनथडी पूल दुरुस्तीकरिता निविदा प्रक्रिया सुरू आहे. नदीपात्रातील रपट्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्तावाला अजून मान्यता मिळाली नाही. रपटा निर्माण करण्याकरिता सुमारे अडीच कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
विनोद चुरे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर