प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम : बुजविलेले खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रणतुमसर : पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मुर्री ते चांदपूर या दीड कि.मी. रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. या डागडुजीवर सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च करण्यात आले. येथे डागडुजीमुळे उलट अपघाताची शक्यता वाढली आहे.मुर्री ते चांदपूर हा डांबरीकरणाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ते खड्डे बुजविण्याची कामे नुकतीच करण्यात आली. हे खड्डे बारीक गिट्टी व डांबराने भरण्यात आले. खड्याच्या वर हे साहित्य आल्याने हे खड्डे निसरडे झाले आहेत. थातूरमातूर हे खड्डे (पॅचेस) भरण्यात आले. प्रसिद्ध चांदपूर हनुमान मंदिराकडे हा मार्ग जातो. त्यामुळे वाहनांची वर्दळ या मार्गावर नेहमीच असते. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गावाला रस्त्याने जोडण्याची ही योजना आहे. जिल्हास्तरावर यांचे स्वतंत्र कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे.या योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्व होतात अशी ख्याती या विभागाची आहे. सरळ केंद्रातून रस्त्यांकरिता येथे निधी येतो हे विशेष. आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या रस्ता बांधकामाची ओरड होती. यात पुन्हा येथे भर पडली. सदर रस्ता पाच वर्षापूर्वी या योजनेअंतर्गत तयार करण्यात आला होता. सन २०१६ मध्ये येथे संपूर्ण रस्ता तयार करण्याचे नियोजन असल्याची माहिती आाहे. (तालुका प्रतिनिधी)
मुर्री-चांदपूर रस्त्याचे काम थातूरमातूर
By admin | Published: December 31, 2015 12:36 AM