विशाल रणदिवे
अड्याळ : ग्रामवासीयांनी आपली समस्या वारंवार सांगूनसुध्दा महामार्ग कंत्राटदार मानायला तयार नाही शेवटी शुक्रवार दुपारच्या सुमारास महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असणारे नाली बांधकाम अड्याळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बंद केले त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामस्थांना गावातील सांडपाणी हे गावाबाहेर असणाऱ्या नाल्यापर्यंत गेले पाहिजे, अशी मागणी आजची नसून आधीपासूनची आहे. महत्त्वाचे म्हणजे तसा अहवालसुध्दा महामार्ग कंत्राटदार यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना एक सोडून दोनदा तसा पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष घातले जात नाही आणि आज शेवटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढे गावाला त्रास होऊ नये यासाठी हा पाऊल उचलले असल्याचे मत यावेळी सरपंच जयश्री कुंभलकर यांनी व्यक्त केले आहे.
गावातील दोन्ही बाजूला म्हणजे पेट्रोल पंप आणि वंजारी राइस मिलपर्यंत दोन्ही बाजूला असणाऱ्या नाल्याचे बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. यामुळेच ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण गावातील संपूर्ण सांडपाणी वाहून जर गावाच्या बाहेर निघाला तर पावसाळ्यात होणारा त्रास होणार नाही तसेच आता ज्या ठिकाणी दोन्ही रस्त्याच्या बाजूला नाल्यांची शेवट होणार त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो आणि हा धोका जर टाळायचा असेल तर होणारे नाल्यांचे बांधकाम लांबी वाढविणे गरजेचे आहे आणि अशा प्रकारची माहिती या आधी कंत्राटदार यांनी लेखी स्वरूपात उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना ४ जून २०२० व ३० जानेवारी २०२१ ला असे दोनदा दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गेली सहा महिन्यात यावर तत्काळ पणे संबंधित अधिकारी यांनी जर कारवाई केली असती तर आज कदाचित हे काम बंद पडले नसते; पण आज कंत्राटदार यांना जर तसा आदेश आला तर आम्ही काम करण्यास तयार आहोत, असेही यावेळी कंत्राटदार अधिकारी गिरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गावच्या दोन्ही बाजूला महामार्गाच्या बांधकाम झाले असले तरी गावातून आतापर्यंत बांधकाम ना धळ नालीचे झाले ना रस्त्याचे ना विद्युत ना पाणी पुरवठा होणाऱ्या पाइपलाइनचे झाले आहे जिथे काम झाले ते झाले; पण पूर्ण काहीच नाही त्यामुळे अड्याळ ग्रामवासी त्रस्त आहेत; पण याकडे लक्ष द्यायलासुद्धा संबंधित विभाग अधिकारी यांच्याकडे वेळ नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता नवीन चर्चा गावात सुरू आहे ती म्हणजे भुयारी पादचारी मार्ग तर दुसरीकडे दिवायडर अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर ग्रामस्थ चिंता व्यक्त करत असतानासुद्धा येथील लोकप्रतिनिधी मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याने आता ग्रामवासी मोठा पवित्रा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.