तुमसर: मुंबई - हावडा रेल्वेमार्गावर तिसऱ्या रेल्वे ट्रॅकचे काम गत काही महिन्यांपासून सुरू असून, आता या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत या मार्गावर दोनच ट्रॅक अस्तित्वात असून, वाढत्या मालगाड्या व प्रवासी गाड्यांची संख्या बघता या मार्गावर रेल्वे प्रशासनाने तिसरा ट्रॅक करण्याचा निर्णय घेतला. सदर ट्रॅकवर सेमी हायस्पीड गाड्या धावणार असल्याची माहिती आहे.
ब्रिटिशांच्या कार्यकाळात मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर एका ट्रॅकचे काम केले होते. त्यानंतर भारत सरकारने दुसऱ्या रेल्वे ट्रॅकचे बांधकाम केले. गत पन्नास वर्षात या मार्गावर नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम झाले नव्हते. तीन वर्षांपासून मुंबई हावडा दरम्यान तिसरा रेल्वे ट्रॅक तयार करण्यात येत आहे. हावडापासून कामाला सुरुवात झाली. रेल्वे ट्रॅकचे काम गोंदिया, तिरोडा, तुमसर दरम्यान सुरू आहे.
या मार्गावर तिसऱ्या रेल्वे ट्रॅककरिता अनेक लहान-मोठे पूल बांधकाम करण्यात आले असून, तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधकाम अर्धेअधिक झाले आहे. केवळ लोखंडी स्पॉन तेवढे शिल्लक आहे.
मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील तिसरा रेल्वे ट्रॅक सेमी हायस्पीड असल्याची माहिती आहे. या मार्गावर मालगाडीसोबतच प्रवासी गाड्यांची संख्या मोठी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला मालगाड्या वाहतुकीतून दरवर्षी विक्रमी कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो. हावडापर्यंत रेल्वेमार्ग असल्याने या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसरा रेल्वे ट्रॅक रेल्वे प्रशासनाने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीचे दोन्ही रेल्वे ट्रॅक हे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आले होते; परंतु तिसरा रेल्वे ट्रॅक तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेमी हायस्पीड रेल्वे गाड्याकरिता हा ट्रॅक तयार करण्यात येत आहे, असे समजते.
कामावर कोरोनाचे सावट
सध्या विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रेल्वे ट्रॅकचे काम करणारे तांत्रिक कर्मचाऱ्यांसह काही स्थानिक मजूर येथे रेल्वे ट्रॅकचे काम करतात. तांत्रिक कर्मचारी हे परराज्यातील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे ट्रॅकच्या बांधकामावर त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येतात. मागील वर्षी रेल्वेच्या कामाला कोरोना वाढल्याचा फटका बसला होता. पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे रेल्वे ट्रॅकच्या कामाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.