लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर/करडी (पालोरा) : धरणे आंदोलनादरम्यान भोवळ आल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचा मृतदेह घेऊन बुधवारी दुपारी कामगार देव्हाडा येथील एलोरा पेपर मिलवर धडकले. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक आणि तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने तिढा सुटला आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला.हेमराज परसराम मारबते (वय ६०, रा. देव्हाडा, ता. तुमसर) असे मृत कामगाराचे नाव आहे. देव्हाडा येथे एलोरा पेपर मिल असून, येथील कामगारांनी ९ ऑगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास हेमराज मारबते आंदोलनस्थळी आले. तेथे त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना इतर कामगारांनी तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पठविण्यात आले. भंडारा येथे मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हेमराज पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. या घटनेने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एलोरा पेपर मिलच्या कामगारांत तीव्र असंतोष असून, कारखाना प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. मागील ९ ऑगस्टपासून येथील कामगार धरणे आंदोलन करीत आहेत. परंतु प्रशासनाच्या कोणताही अधिकारी याकडे फिरकला नाही, हे विशेष. दरम्यान भंडारा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर हेमराज यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक व कामगार बुधवारी दुपारी ३.३० वाजता देव्हाडा कारखान्यावर पोहचले. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेऊन संताप व्यक्त केला. यावेळी एलोरा पेपर मिलचे व्यवस्थापक बंधुराम आणि मोहाडीचे प्रभारी तहसीलदार बाळासाहेब तेढे यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी रोख २५ हजार रुपये हेमराजच्या नातेवाइकांना मदत म्हणून देण्यात आली. तसेच उर्वरीत मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे समाधान झालेल्या कामगारांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी भंडाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार जी.यु. सोनकुसरे, कामगार अधिकारी गांगुर्डे, पंधरे, करडीचे ठाणेदार नीलेश वाजे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे आदी उपस्थित होते. नातेवाइकांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकत होता.
आंदोलनाची दखल नाही- गत ९ ऑगस्टपासुन पेपर मिलचे कामगार थकीत वेतन व विविध देयकांसाठी धरणे आंदोलन देत आहेत. परंतु त्यांच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान मंगळवारी दुर्देवी घटना घडली. यापुर्वीच कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या असत्या तर हेमराज याचा प्राण गेला नसता. अशी चर्चा कामगार करीत आहेत.
न्यायासाठी लढताना एलोरा पेपर मिलमध्ये एक कामगार शहीद झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. मिल मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करावा. मिल पुन्हा सुरू करून मजुरांना कामावर घेऊन त्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील. आवश्यकता पडल्यास तीव्र भूमिका मजूर संघ घेणार.-चरण वाघमारे, माजी आमदार तथा अध्यक्ष, राष्ट्रीय मजूर संघ देव्हाडा.