लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : माल वाहतूक करणाऱ्या लोको ट्रेनच्या धडकेने कामगार ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३५ वाजताच्या सुमारास येथील सनफ्लॅग ऑयर्न ॲन्ड स्टील कंपनीत घडली. हाकेच्या अंतरावर असलेल्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती तीन तासानंतर दिली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर मृतदेहासह आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.विकास गणवीर ५३, रा. शास्त्री वॉर्ड वरठी असे मृताचे नाव आहे. तो सनफ्लॅगमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून कामावर होता. मंगळवारी रात्री कार्यरत होता. लोको पॉयलट ट्रेनद्वारा होणारी माल वाहतूक डब्यातून येणाऱ्या मालाला वॅगन ट्रीपलच्या सहायाने खाली करण्याचे काम सुरू होते. दरम्यान माल वाहतूक करणाऱ्या गाडीला इतर डब्यापासून जोडण्याचे काम सुरू असताना लोको पॉयलटच्या चुकीने विकास दोन्ही डब्याच्या मध्यात अडकला. जोरदार धडक बसून त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या कुटुंबियांना अपघाताची माहिती तीन तासानंतर दिली. किरकोळ अपघात झाल्याचे कळविल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर बुधवारी सकाळी कुटुंबाला आर्थिक मदत, नौकरी व तांत्रिक शिक्षण देण्याची मागणी करत कंपनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मृतदेहासह आंदोलन करण्यात आल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला. डॉ. विनोद भोयर यांच्या नेतृत्वात माजी सरपंच संजय मिरासे, सुमीत पाटील, रितेश वासनिक, अतुल भोवते, अरविंद येळणे, शरद वासनिक, मिलिंद धारगावे, सुरेखा हुमणे, वसंत हुमणे, दिलीप उके यांनी आंदोलन केले. त्यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पुढाकार घेत कंपनी व्यवस्थापन आणि कुटुंबीया संवाद घडून आणला. सहा तासानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. विकासच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई आहे. विकास हा घरातील एकमेव कमावता पुरूष होता. मुले शिक्षण घेत असून पती-पत्नी मिळून मोलमजुरीच्या भरोशावर कुटुंबाचा गाढा हाकत होते.
हुंदके आणि हक्काचा लढा विकासची पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, बहीण सुरेखा यांच्यासह गावकरी कंपनीसमोर ताटकळत होते. घरचा आधार गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून हुंदके देत न्यायाचा लढा लढत होते. वडिलांचा मृतदेह पाहून मुलींचा आक्रोश सुरू होता. आधार गमावल्याने कस जगायच, असे अनेक प्रश्न निर्माण झाले हाेते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूधारा लागल्या होत्या.