राहुल भुतांगे
तुमसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने प्रवेश निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशप्रक्रिया रेंगाळली आहे. त्याच आरटीई पोर्टलवर संचारबंदीनंतरच प्रवेशप्रक्रियेबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांमध्ये प्रवेश निश्चितीबाबत संभ्रम निर्माण झाले आहे.
राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अर्थात आरटीईअंतर्गत होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेवर होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरच प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये हे प्रवेश लांबले. अगदी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया सुरू राहिली.
यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात आली होती, तर १५ एप्रिलला सोडतीत नावे असलेल्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाची तारीख कळविण्यात आली होती. त्यानुसार, १९ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झाल्याने आरटीई प्रवेशाला ब्रेक लागला आहे.