इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार आरटी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव करण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर ११ जून म्हणजे शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र गतवर्षी कोरोनामुळे अभ्यासाविना गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष असेच गेले. या वर्षीही तशीच परिस्थिती राहणार काय, असा सवाल व चर्चा पालकांमध्ये हाेत आहे.यंदा आरटीई अंतर्गत राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ६८३ विद्यार्थ्यांची नावे वेटिंग लिस्ट अंतर्गत आहे. नियमानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने २,०५१ अर्ज प्राप्त झाले होते. आता ११ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यात गतवर्षीप्रमाणे गरीब विद्यार्थी अभ्यासाविना तर राहणार नाही ना अशी चर्चा होत आहे.
गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत
जिल्हा पातळीवर आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश दिला जाईल, यात कुठलीही शंका नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर म्हणाले, गरीब विद्यार्थ्यांजवळ अभ्यासासाठी कुठलेही साधने उपलब्ध नसतात. डिजिटल शिक्षणाबाबत तर ते कोसो दूर असतात. अशावेळी शिक्षण विभागामार्फत त्यांना साधनेही उपलब्ध करून द्यायला हवीत. मात्र तसे कधीच झालेले नाही. गरिबांसाठी राज्य शासनाने आरटीई ॲक्ट आणला, ही चांगली बाब आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी काळाची गरज आहे. कोरोना महामारी तर ही अत्यंत निकषपूर्ण बाब आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या पाल्यांना तंत्रयुक्त शिक्षण देण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आधीच शासनाकरवी शाळांना आरटीईची रक्कम मिळालेली नाही.
आरटीई अंतर्गत यावर्षी प्रवेशासाठी ७८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भंडारा तालुक्यात २३७, लाखांदूर १९, लाखनी ७१, मोहाडी ११८, पवनी ७७, साकोली ८६ तर तुमसर तालुक्यातील १७६ विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. सदर प्रवेश भंडारा तालुक्यातील २७, लाखांदूर ४, लाखनी ९, मोहाडी १६, पवनी १२, साकोली १० तसेच तुमसर तालुक्यातील १६ शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
पालक म्हणतात, वर्ष वाया गेले !
राज्य शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले. आरटीईअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांचे वर्ष वाया गेले, असेच म्हणावे लागेल. यावर्षी तरी असे व्हायला नको.- विनोद रामटेके, लाखांदूर
ऑनलाइन पद्धतीने माझ्या पाल्याचा प्रवेश केला होता. मात्र कोरोनामुळे शाळाच भरली नाही. आता पुन्हा यावर्षीही तशीच स्थिती राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे शासनाने साधने उपलब्ध करून द्यायला हवीत.- ममता कारेमोरे, भंडारा
यावर्षी माझ्या पाल्याच्या प्रवेश आरटी अंतर्गत करणार आहे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे शाळाच उघडली नाही. या सत्रात तरी शाळा उघडेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. शासनाने यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे.- सचिन शेंडे, साकोली