भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील खासगी अनुदानित आश्रमशाळेतील ४३ विद्यार्थ्यांना गुरुवारी अन्नातून विषबाधा झाली. यातील सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सद्यस्थितीमध्ये तुमसर उपजिल्हा रुग्णालयात २० विद्यार्थी तसेच जिल्हा रुग्णालयात भंडारा येथे एकूण २३ विद्यार्थी भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तुमसर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोबरवाही येथील येरली येथे शासन अनुदानित आश्रमशाळा आहे. येरली येथील लोकसंख्या ३७४७ आहे. आश्रमशाळेमध्ये मुले २१३ व मुली १९८ असे एकुण ४३१ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २४ ऑगस्ट रोजी मुले १४९ व मुली १५७ असे एकुण ३१६ विद्यार्थी उपस्थित होते.
गुरूवारला एकुण ३१६ विद्यार्थ्यानीं दुपारी १ वाजता जेवण केले. आश्रम शाळेमध्ये त्यांच्या जेवणामध्ये आलू वाटाण्याची भाजी, भात व वरण देण्यात आले होते. तसेच संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी तापासारखे लक्षणे जाणवू लागले. ही बाबीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, गोबरवाही यांना संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात गोबरवाही अंतर्गत आरोग्य पथक आश्रम शाळेत दाखल झाले.
आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागले त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यामध्ये एकुण ४९ रुग्णांना असा त्रास असल्याचे जाणवले. विद्यार्थ्यापैकी एक मुलगा व ४२ मुली असे एकुण ४३ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. २३ विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात डिहायड्रेशन असल्यामुळे त्यांना रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालय भंडारा येथे सेवा संदर्भात करण्यात आली. विद्यार्थ्यापैकी १ मुलगा व २२ मुली असे एकूण २३ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे भरती आहेत.पथकामार्फत तपासणी
अन्न विषबाधा बाबतची जिल्हास्तरावरून जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तसेच अन्नाचे नमुने व इतर कारणांचा शोध घेणे सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये साथ उद्रेक आटोक्यात असून साथ उद्रेकाची चौकशी सुरू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी सांगितले.