लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनमुळे आर्थिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या स्थितीतही माणसामधील माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यात आला. नेहमीप्रमाणे गावाबाहेरील रस्त्याच्या कडेने पृथ्वीराज मेश्राम सोमवारी सकाळी फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पाकीट पडलेले दिसले. ते उघडून पाहिले असता त्यात बऱ्याचशा नोटा दिसल्या. त्या परत केल्याच पाहिजेत या विचाराने गावात येऊन त्यांनी हे वृत्त अनेकांना सांगितले व मालकाचा शोध घेण्यासाठी विनंती केली.
मात्र त्या पाकिटात मालकाचा कुठलाच पत्ता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला. मेश्राम यांनी ते पाकीट स्वत:जवळच ठेवून घेतले. या विषयाची चर्चा गावात बरीच रंगली. त्यातच कुणीतरी हे वृत्त वॉटसअपवरही टाकले. ते मग गावोगावी फिरले आणि आश्चर्य, मंगळवारी सकाळी त्या पाकिटाच्या मालकाचा शोध लागला. ते त्याच गावात सुतारकाम करणाऱ्या थालीराम बावणे यांचे होते.
मालकाचा पत्ता कळताच मेश्राम गावातील काही व्यक्तींना घेऊन त्यांच्या घरी गेले व ते त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर झलके, माजी उपसरपंच योगेश झलके ग्रामपंचायत सदस्य टिकेस्वर मेश्राम, तसेच तुळशीदास कठाणे उपस्थित होते. पाकिट बावणे यांचेच आहे याची खातरजमा करून घेत ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
आपले हरवलेले पाकिट पाहताच बावणे सद्गदित झाले. हरवलेले १३ हजार परत मिळाले यावर बावणे यांचा विश्वासच बसत नव्हता. पृथ्वीराज मेश्राम यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याजवळील शब्द अपुरे पडत होते. ही घटना पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली तेव्हा मेश्राम यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत होते.