पालांदूर : आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मानवाला व्यायामाची नितांत गरज आहे. शरीरात नैसर्गिक ऊर्जा तयार होण्याकरिता व्यायाम हा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. नैसर्गिकरीत्या शरीरात ऊर्जा तयार करण्याकरिता योग प्राणायाम खूप महत्त्वाचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मऱ्हेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित जवंजाळ यांच्या उपस्थितीत योग शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत पटांगणात पार पडले.
यावेळी सरपंच टिकाराम तरारे, योगशिक्षक सुनील भाग्यवनी, अंगणवाडी शिक्षिका शीला पाथरीकर, अंगणवाडीसेविका अनिता बोरकर व ग्रामपंचायत सदस्यसह गावकरी महिला भगिनीसह योग शिबिराला उपस्थित होते.
अगदी सकाळच्या गावातील तरुणांना योग शिबिराची हाक देताच तरुण मंडळी हजर झाली. यात प्राणायाम, कपालभाती यासारखे विविध योगांचे धडे उपस्थितांना योगशिक्षक सुनील भाग्यवनी यांनी दिले.
दिवसेंदिवस वातावरणातील प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. प्रत्येक व्यक्ती आरोग्य प्रति जागृत व्हावा व नैसर्गिकरीत्या त्याच्या आयुष्याचे निरोगी जीवन त्याला जगता यावे, याकरिता योग प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या योग व प्राणायामकरिता गावकऱ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांना या विषयाचे ज्ञान मिळावे, निर्व्यसनी जीवन घडावे, या उदात्त हेतूने आरोग्यवर्धनी उपकेंद्र मऱ्हेगावतर्फे वाकल येथे ग्रामपंचायत पटांगणात योग शिबिर उत्साही वातावरणात पार पडले.