भंडारा : पवनी येथील पद्मा वाॅर्डातील बांधकाम ठेकेदार योगेश लोखंडे याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर योगेशची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध योगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. ही आत्महत्या असल्याचे पोलिस सांगत असले तरी संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता अनेक ठिकाणी संशयाला वाव आहे. यामुळे या प्रकरणातील गुंता बराच वाढला आहे.
योगेश २७ फेब्रुवारीला घरून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा मोबाइल बंद येत होता. त्याचा शोध घेऊनही तपास न लागल्याने नातेवाइकांनी १९ मार्चला वृत्तपत्रात त्याच्या बेपत्ता असण्याची जाहिरात दिली होती. त्यानंतरही शोध सुरूच होता. दरम्यान, ७ एप्रिलला त्याचा मृतदेह शहरापासून तीन किलोमीटरवरील इटगावच्या शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी पंचनामा केल्यावर त्याचा मृत्यू किमान १० ते १२ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे बेपत्ता झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात तो नेमका होता कुठे, त्याचे कुणी अपहरण करून ठेवले होते का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुचाकीचेही गौडबंगाल
विशेष म्हणजे, ७ एप्रिलला प्रेत सापडल्यावर पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा शोध परिसरात घेतला. मात्र ती कुठेच आढळली नाही. मात्र, त्याचे प्रेत सापडल्याच्या घटनास्थळापासून फक्त ३०० मीटर अंतरावर २६ एप्रिलला म्हणजे २१ दिवसांनी त्याची दुचाकी नहरात सापडली. पवनी-इटगाव मार्गावर डावीकडे नहरात त्याचे प्रेत सापडले, तर सव्वा महिन्याने त्याच नहरात उजवीकडे त्याची दुचाकी पालापाचोळ्याने झाकलेली आढळली. पोलिसांच्या सर्चिंगमध्ये दुचाकी आढळलेली नसताना ती सव्वा महिन्याने आढळणे म्हणजे शंकेला वाव असण्यासारखे आहे.