लोभी शेतशिवारातील प्रकार : गुन्हे शाखेची कारवाई, १० दुचाकीसह तीन लाखांचे साहित्य जप्त भंडारा : मध्यप्रदेश सिमेलगतच्या नदी काठावर कोंबड बाजार सुरू होता. ही माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच कोंबड बाजारावर ‘सिनेस्टाईल’ छापा घातला. या कारवाईत १० दुचाकींसह आठ जुगारूंना अटक केली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील लोभी शेतशिवारात करण्यात आली. निरंजन भाऊराव शेंडे (५०), दिगांबर हरीराम सोनवाने (५०) रा. आष्टी, अशोक किसन जांगळे (४५), गणेश देवाजी वासनिक (४५) रा. तुमसर, गोपाल नारायण खळोदे (५३) रा. नागपूर, गौतम अर्जुन राऊत (५०) खापा मोहाडी, मोतीराम कृष्णा देवगडे (५०), विनोद दसाराम राऊत (२७) रा. मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या जुगारूंचे नावे आहेत. त्यांच्याकडून १० दुचाकी व कोंबड बाजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तुमसर तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या शेवटच्या टोकावरील लोभी शेतशिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर ही कारवाई शुक्रवारला करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये कोंबड बाजार भरविल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. शुक्रवारला कोंबड बाजार सुरू असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या पथकाने लोभी शेतशिवार गाठले. यावेळी कोंबडबाजार सुरू असल्याने अनेकांची गर्दी होती. मात्र पोलीस आल्याचे लक्षात येताच अनेकांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अनेकांचा सिनेस्टॉईल पाठलाग केला. यात आठ जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत तीन लाख १५ हजार रूपयांच्या १० दुचाकी, अंगझडतीत एक हजार ७०० रूपये, चार मोबाईल, कातीचे कोंबडे, लोखंडी कात्या असा तीन लाख २२ हजार १३० रूपयांचे जुगार व कोंबड बाजाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या जुगारूंना गोबरवाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या सर्वांविरूद्ध गोबरवाही पोलिसांनी मुंबई जुगारबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. यानंतर अटक केलेल्या सर्व जुगारूंना सुचनापत्र देवून सोडण्यात आले.या कारवाईत सहायक फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोलीस हवालदार सुधीर मडामे, राजेश गजभिये, सावन जाधव, रोशन गजभिये, वैभव चामट, रमाकांत बोंदरे, चेतन कोटे यांचा समावेश होता. या कारवाईने कोंबड बाजार जुगाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी) सिनेस्टॉईल पाठलाग... आरोपी ताब्यातमागील अनेक दिवसापासून कोंबड बाजारात लाखोंचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. कारवाई करण्याच्या अनुशंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने खासगी वाहनाने जुगारस्थळ गाठले. यावेळी पोलीस आल्याचे काहींच्या लक्षात येताच पळापळ सुरू झाली. अनेकांनी पळ काढताना त्यांचे साहित्य तिथेच सोडले. पळून जाणाऱ्यांच्या मागे पोलीसांनी सिनेस्टॉईल पाठलाग केला. अनेकजण यात खाली पडून किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर यातील अनेकांनी त्यांना सोडून देण्याची केविलवानी विनंती करून यानंतर जुगार खेळणार नसल्याचे सांगितले. मात्र पोलिस कारवाईपासून ते वाचू शकले नाही.
तुमसरात कोंबड बाजारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 12:15 AM