भंडारा : दूरच्या खेड्यात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीसोबत शहरातील एका लॉजवर मौजमजेसाठी आलेल्या तरुणाने कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला. मात्र, परिणाम उलट झाला. प्रचंड रक्तदाब वाढल्याने त्याचा रात्रीच लॉजवर मृत्यू झाला. प्रियकरासोबत आयुष्य सुखात काढण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या प्रेयसीवर मात्र वियोगाचा प्रसंग ओढावला.
कृष्णा धनजोडे (२३, केशोरी, ता.कामठी, जिल्हा नागपूर) असे या तरुणाचे नाव असून, त्याची प्रेयसी गोंदीया जिल्ह्यातील आहे. दोघेही मजुरीचे काम करायचे. त्या कामावरच त्यांचे प्रेम जुळले. दरम्यान, आपल्या प्रेयसीला घेऊन कृष्णा २० ऑगस्टला भंडारामध्ये आला. दिवसभर खरेदी, हॉटेलिंग करून दोघेही हिरणवार लॉज येथे थांबले. या दरम्यान रात्री (२१ च्या पहाटे) साडेचार वाजताच्या सुमारास प्रेयसीला जाग आली असता, कृष्णा बेशुद्धावस्थेत दिसला. तिने लॉजवरील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी कृष्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या मेमोच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निखिल रहाटे तपास करत आहेत.
खिशात मिळाल्या कामोत्तेजक गोळ्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅजवरील रूममधून कृष्णाच्या खिशातून कामोत्तेजक गोळ्यांचे पाकीट मिळाले. त्यातील १०० एमजीच्या दोन गोळ्या रिकाम्या होत्या. कृष्णाने त्या सेवन केल्याची माहिती प्रेयसीने पोलिसांना दिली. कृष्णाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले, तरी या गोळ्यांमुळे रक्तदाब वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.