लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच सुरू केली. परंतु, भावांसाठी कोणतीही योजना का नाही, असे प्रश्न उपस्थित करणारे मनोरंजनात्मक अनेक रिल्स व व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. लाडक्या भावांनाही काही तरी द्या, असा सूर त्यामधून व्यक्त होत आहे.
सध्या मनोरंजनासाठी रिल्स तयार करून शेअर करण्याची क्रेझ सर्वत्र आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर पोस्ट टाकणे, व्हॉट्सअॅपवर स्टेटस बदलणे, मेसेजेस पाठवणे आणि त्यांवरील रिप्लाय, लाइक्स, कमेंटस् बघणे, त्यासाठी वेळ खर्ची घालणे, ही आज तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे. नुकतीच शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना जाहीर केली. यामुळे नेटकऱ्यांना मनोरंजक रिल्स तयार करण्याची चांगलीच संधी मिळाली आहे.
काहींनी 'साहेब, लाडक्या भावालाही काहीतरी योजना द्या', अशा रिल्स तयार केल्यात, तर काहींनी विनोदाने 'शेतकऱ्याले ५०० रुपये महिना अन् बायकोले १५०० रुपये, शेती करू का दुसरी बायको करू काही समजत नाही,' असा सूर आवळला आहे. एका लहान मुलाने वा रे सरकार, स्त्री-पुरुष समानता. योजना फक्त महिलांसाठीच. बस प्रवास निम्मी भाड्यात, आता १५०० रुपये, आम्ही लाडके नाहीत का, आम्ही काय गुगलवरून डाउनलोड झालो आहोत का? अशा एक ना अनेक मनोरंजक रिल्स सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल केल्या आहेत.
एका मुलाने, आमच्यासाठीही एखादी स्कीम काढावी लागत होती, माझा लाडक्या सोन्या म्हणून, नाही दीड हजार तर, हजार रुपये, हजार नाही, तर ५०० रुपये आमचे महिन्याचे खरी- पानी तर भागले असते, रिचार्ज भागले असते, काढा न एखादी स्कीम, बेरोजगार नावाची, अशा मनोरंजक रिल्स सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल केल्या आहेत.
रिल्सच्या माध्यमातून 'लाडक्या बहिणी'ची चर्चा• सध्या छोटे-छोटे व्हिडीओ बनवून त्या रिल्स आपल्या खात्यावर अपलोड करायच्या आणि आपल्याशी जोडलेल्यांच्या प्रतिक्रियांमध्ये रमून जायचे, हा आज अनेकांचा 'उद्योग' बनला आहे. यामध्ये ज्यांचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत, त्यांना तर या माध्यमातून कमाईच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागात रिल्सच्या माध्यमातून 'लाडक्या बहिणी'ची सर्वत्र चर्चा होत आहे.
साहेब, झाडावरून उतरणार नाही• एकाने तर चक्क प्रधानमंत्री मोदी यांचे संवाद ऑडिट करून भावांना एखादी योजना लागू करा, अन्यथा झाडावरून खाली उतरणार नाही, असा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओच्या रिल्समुळे सध्या सोशल माध्यमात चांगलीच चर्चा रंगत आहे. मनोरंजनही होताना दिसत आहे.